पुणे : संपूर्ण शहराच्या आरोग्यासाठी रात्रंदिवस कार्यरत असणारे महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी व्यसनांच्या विळख्यात अडकत असतील तर त्यांना व्यसमुक्तीच्या मार्गावर नेणे, ही आपल्या सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे, असे मत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांनी व्यक्त केले.
महानगर पालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने आणि मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या सहकार्याने सफाई कर्मचाऱ्यांसाठी आयोजित व्यसनुमक्ती आणि मनःस्वास्थ्य शिबिराचे उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पुणतांबेकर बोलत होत्या. याप्रसंगी उपमहापौर सरस्वती शेंडगे, पुणे महानगर पालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा माधुरी सहस्त्रबुद्धे, अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल, उपायुक्त अजित देशमुख, माधव जगताप, प्रमुख आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती, डॉ. अंजली साबणे, सहाय्यक आयुक्त आशा राऊत उपस्थित होते. पहिल्याच शिबिरात तीन क्षेत्रीय कार्यालयातील सुमारे शंभर सफाई कर्मचारी सहभागी झाले होते.
मुक्ता पुणतांबेकर म्हणाल्या, पुणे महानगर पालिकेने सुरू केलेला मानसिक स्वास्थ्य आणि व्यसनमुक्ती हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. समाजात वाढत चाललेल्या व्यसनाधिनतेमुळे व्यसनाधीन व्यक्तीवर, त्याच्या कुटुंबावर अतिशय भयावह दुष्परिणाम होतात.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, सध्या चालू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१ च्या अनुषंगानेही या कार्यक्रमाचे अधिक महत्त्व आहे. सहस्त्रबुद्धे यांनी या शिबिरांची व्याप्ती वाढवावी, त्यासाठी पुणे महानगर पालिकेकडून संपूर्ण सहकार्य मिळेल.
माधुरी सहस्त्रबुद्धे म्हणाल्या की, महानगर पालिका कर्मचाऱ्यांना व्यसनमुक्ती शिबिरात दाखल होण्यासाठी पगारी रजा देणे आणि त्या खर्चाचा भार महानगर पालिकेने उचलणे अशी महत्त्वाची तरतूद महिला व बालकल्याण समितीच्या वतीने केली आहे. पुढील तीन महिन्यात एकूण ६ कार्यशाळांचे आयोजन केले आहे. सुरेश परदेशी यांनी सूत्रसंचालन केले.