लाखेवाडी : जानेवारीनंतर उन्हाळ्यात दूध खरेदीचे दर वाढत असत. मात्र यावर्षी दुधाचे दर घसरण्याची शक्यता आहे; कारण शासनाने दिलेले अनुदान दोन महिन्यांपासून बंद झाल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता असताना सरकार बघ्याची भूमिका घेत आहे.आॅक्टोबरनंतर दूध संकलनात वाढ होते. जानेवारी अखेरपर्यंत दूध वाढीचा कालावधी असतो. फेब्रुवारीपासून दूध संकलन हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते. मार्चनंतर दूध संकलनात मोठी घट होते. त्यामुळे मार्चनंतर दूध खरेदी दरात वाढ होण्यास सुरुवात होते. पंरतु गेल्या दोन महिन्यांपासून अनुदान बंद असल्यामुळे दूध दर घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातच दुष्काळाची तीव्रता भयानक निर्माण झाली आहे. पाणी टंचाई जाणवू लागली आहे. जनावराच्या पशुखाद्याच्या वाढलेल्या किंमती पाहता दुधाला प्रतिलिटर ३० रुपयांहून अधिक दर मिळाला पाहिजे, अशी मागणी शेतकºयांमधून जोर धरत आहे. शासनाने अनुदान बंद केले आहे. परंतु भविष्यात अनुदान मिळेल, या आशेवर लाखेवाडी (ता. इंदापूर) येथील दूध उत्पादक शेतकºयाला कुलरचालक २५ रुपये दूध दर देत आहेत. अनुदान मिळाले नाहीतर येत्या काही दिवसात १८ ते २० रुपयाने दूध खरेदी केले जाईल. दूध व्यवसाय संकटात सापडेल, अशी भीती शेतकºयांना वाटत आहे. त्यामुळे सरकारने वेळेतच लक्ष देऊन अनुदान सुरु करावे. लाखेवाडी गाव हे इंदापूर तालुक्यात दूध व्यवसायात अग्रेसर आहे. जवळपास गावामध्ये ५० हजार लिटर दररोजचे दूध संकलन आहे. हा दूध व्यवसाय खाजगी डेअरी मार्फत चालवला जात आहे. दरवर्षी जानेवारीनंतर दुधाचे दर वाढत असतात. याप्रमाणे याही वर्षी दर वाढतील या अपेक्षेने शेतकरी दर वाढीकडे डोळे लावून जनावरांचे संगोपन करीत आहेत. येत्या काही दिवसात शासनाने लक्ष दिले नाही तर दूध दर घसरतील आणि शेतकºयावर संकट कोसळले जाईल, असे सांगितले जात आहे.> दुष्काळात तेरावा..वास्तविक यंदा पाऊस झाला नसल्याने या परिसरात पाण्याची भीषण टंचाई जानेवारीतच जाणवू लागली आहे. दुष्काळामुळे शेती व्यवसाय संकटात सापडला असताना जनावरांना चारासुध्दा दुरापास्त झाला आहे. किमान दूध व्यवसाय सुरळीत रहावा म्हणून जनवारांना जादा दराने चारा विकत आणावे लागत आहे. त्यामुळे उन्हाळ््यात शेतीला पाणी मिळणे दूर, पिण्यासाठी सुध्दा नागरिकांना पायपीठ करावी लागणार आहे.
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 01:54 IST