पुणे : महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाशी आघाडी करण्याचा निर्णय प्रदेश पातळीवरच घेतला जाणार आहे. मात्र, काही प्रभागांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी व्हावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांनी मंगळवारी दिली.भाजपाचा प्रभाव असलेल्या प्रभागांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र येऊन निवडणूक लढविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांच्याकडे विचारणा केली असता काही प्रभागांमधील कार्यकर्त्यांकडूनच तशी मागणी पक्षाकडे करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. पक्षाच्या आगामी उमेदवार निवडप्रक्रियेची माहिती देण्यासाठी त्यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी महापौर प्रशांत जगताप, माजी महापौर मोहनसिंग राजपाल उपस्थित होते.चव्हाण यांनी सांगितले, ‘‘येत्या २६ नोव्हेंबरपासून पक्षाकडून महापालिकेची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना अर्जांचे वाटप केले जाणार आहे. हे अर्ज भरण्यासाठी ५ दिवसांची मुदत दिली जाणार आहे. त्यानंतर मुलाखती घेऊन उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. उमेदवारांची निवड करताना पक्षाचे नेते अजित पवार यांचा शब्द अंतिम असणार आहे.’’पक्षाचा जाहीरनामा तयार करण्यासाठी नागरिकांच्या सूचना मागविण्यात आल्या आहेत. ‘एनसीपी कनेक्ट’ अंतर्गत या सूचनांचे संकलन करून त्यांचा पक्षाच्या जाहीरनाम्यात समावेश केला जाणार आहे. महापालिकेच्या वतीने गरीब, गरजू तरुण-तरुणींसाठी ‘लाईट हाऊस’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याठिकाणी त्यांना रोजगार मार्गदर्शन केले जात आहे. या उपक्रमाची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी १ डिसेंबरपासून विशेष उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आघाडीसाठी कार्यकर्ते इच्छुक
By admin | Updated: November 16, 2016 03:21 IST