--
इंदापूर : इंदापूर शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील कालठण रोडवरील रस्ता दुभाजक ( डिव्हायडरची ) उंची वाढवावी, नागरिकांना चालण्यासाठी पादचारी मार्ग करावे, तसेच रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करून सुशोभिकरण करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक प्रशांत शिताप यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
इंदापूर शहरातील कालठण रोडवरील बाबा चौक ते इरिगेशन कॉलनी गेटपर्यंतचे रस्त्याचे काम मागीलवर्षी झालेले आहे. परंतु रस्त्याची भूमीवरून उंची वाढल्याने, जुने रस्ता दुभाजक रस्त्याच्या समांतर उंचीला आले आहेत. त्यामुळे रस्त्यावर दुभाजक आहे की नाही ? हेच वाहन चालकांना दिसत नसल्याने, अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याच कालठण रोडला उपजिल्हा रुग्णालय, अतिदक्षता विभागाचे रुग्णालये तसेच मल्टीस्पेशालिटी व ॲक्सीडेंट रुग्णालयासह महिला व बालरोगतज्ञ असे जवळपास ३० महत्वाची रूग्णालये असल्यामुळे बारमाही, २४ तास भरधाव वेगाने रुग्णवाहिकांची वर्दळ चालू असते. त्यामुळे रस्त्याला किमान साडे तीन फूट उंचीचे दुभाजक असणे आवश्यक आहे. तसेच रस्त्यावर वाहतूक सुरक्षा व दिशादर्शक सुरक्षा पट्ट्या करावेत. तसेच डॉ. कदम बालरुग्णालयाच्या बाजूला विद्युत वितरण कंपनीचे उघड्यावर असलेल्या डि.पी. ला सुरक्षा जाळी बसवण्यात यावी, अशीही मागणी शिताप यांनी केली आहे.
---
चौकट :
पुणे - सोलापूर महामार्गावर दुभाजक नसल्याने झाला अपघात
इंदापूर शहरानजीक पायल हॉटेल जवळ सोमवारी दुपारी ४ वाजता पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. चारचाकी वाहन भरधाव वेगात होते. त्या वाहनाचे चालकाच्या बाजूचे टायर फुटून वाहन उजव्या बाजूच्या रस्त्यावर गेले. कारण रस्ता दुभाजक केवळ अर्धा फूट उंचीचे आहे. त्याठिकाणी दुभाजकाची उंची साडे तीन फूट असती तर तेथे चार लोकांचा जीव वाचला असता. त्यामुळे भविष्यातील धोका ओळखून कालठण रोडच्या रस्ता दुभाजकांची उंची वाढवावी असेही नगरसेवक प्रशांत शिताप यांनी सांगितले .
--
फोटो ओळ : इंदापूर शहरातील कालठण रोडची उंची वाढल्याने रस्ता दुभाजक दिसेनासे झाले आहेत.