पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सोमवारी नॅक समितीने भेट दिली. पहिल्या दिवशी समितीच्या सदस्यांनी विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभागांची तपासणी केली. मंगळवारी (दि. २४) विद्यापीठातील प्रशासकीय कार्यालयांची तपासणी केली जाणार असून, बुधवारी विद्यापीठातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून नॅक मूल्यांकनाच्या अहवालासाठी लागणारी आवश्यक माहिती समितीकडून घेण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.नॅक समितीकडून २३ ते २५ जानेवारी या कालावधीत विद्यापीठाची तपासणी केली जाणार होती. त्यामुळे विद्यापीठाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तयारी केली होती. विद्यापीठाचा परिसर चकाचक केला होता. सोमवारी नॅक समितीच्या १० सदस्यांच्या समितीसमोर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी विद्यापीठाची माहिती सादर केली. तसेच इतर अधिकाऱ्यांनीही विद्यापीठ विकासाचा आलेख समितीसमोर मांडला. त्यानंतर समितीच्या प्रत्येकी ३ सदस्यांच्या ३ गटांनी विद्यापीठातील सर्व विभागांना भेट देऊन विभागांच्या कामाची माहिती घेतली. तसेच, विभागांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला. सकाळी ८ पासून समितीकडून सुरू झालेले काम रात्री ८.३०पर्यंत चालू होते.विभागांच्या भेटीनंतर नॅक समितीकडून मंगळवारी विद्यापीठाच्या प्रशासकीय कार्यालयांची तपासणी केली जाईल. विद्यापीठ विकास व महाविद्यालय संचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या विविध प्रशासकीय विभागांना तसेच विद्यार्थी कल्याण मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना विभागासह परीक्षा विभागाला नॅक समिती भेट देणार आहे. (प्रतिनिधी)
‘नॅक’कडून विभागांची तपासणी
By admin | Updated: January 24, 2017 02:21 IST