पुणे : महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या निलंबित प्रभारी प्रमुख शुभांगी चव्हाण यांच्या कार्यकाळातील सर्व व्यवहारांची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समिती सर्व चौकशी करून येत्या पंधरा दिवसांत हा अहवाल सादर करणार आहे.शिक्षण मंडळाच्या प्रमुखपदाचा प्रभारी अधिभार गेल्या जवळपास वर्षभरापासून चव्हाण यांच्याकडे होता. या कालावधीत मंडळाच्या कारभारात आर्थिक अनियमितता झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्याचबरोबर १ कोटीची तरतूद असताना चव्हाण यांनी अतिरिक्त ४६ लाखांची बिले पालिका आयुक्तांच्या मंजुरीविनाच अदा केली असल्याचे समोर आले होते. याप्रकरणी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यानंतर आता चव्हाण यांच्या वर्षभराच्या कार्यकाळातील सर्व खरेदी प्रकरणांची आणि त्यासाठी अदा करण्यात आलेल्या बिलांची चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीसाठी क्रीडा विभाग प्रमुख तुषार दौंडकर, उपायुक्त सुनील केसरी आणि अधीक्षक अभियंता श्रीनिवास कंदुल यांची समिती नेमण्यात आली आहे.
शिक्षण मंडळाच्या वर्षभरातील कारभाराची चौकशी
By admin | Updated: April 28, 2017 06:04 IST