मुंबई : पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल. घटनेची चौकशी करण्यात येत असून, अहवाल आल्यावरच जबाबदारी निश्चित होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पवार म्हणाले की, आग विझली असली, तरी कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर आगीचं प्राथमिक कारण कळू शकेल. मावळ प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञांच्या समितीकडून आगीच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्या चौकशीतून आगीची नेमकी कारणे कळतील व दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करता येईल. जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीची पाहणी करून चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार आगीची चौकशी होईल. पोलिसांनी प्राथमिक गुन्हा नोंदवून घेतला आहे.
पंतप्रधानांकडून मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची मदत
आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या जवळच्या नातेवाईकास पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपये मदत देण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. जखमी व्यक्तींना पन्नास हजार रुपये मदत देण्यात येणार आहे.
एसव्हीएस ॲक्वा टेक्नॉलॉॅजीच्या मालकास घेतले ताब्यात
एसव्हीएस ॲक्वा टेक्नॉलॉॅजी कंपनीचे मालक निकुंज शहा यांना त्यांच्या पुण्यातील घरातून ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी सांगितले की, नेमकी आग कशामुळे लागली हे तपासण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. यात चीफ फायर ऑफिसर, एमआयडीसीचे अधिकारी, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे अधिकारी, तसेच पोलिसांचा समावेश आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. घटनास्थळी पीएमआरडीएचे अधिकारी आणि पोलीस अधिकारीही उपस्थित होते. कंपनीत प्लॅस्टिकच्या रॅपरिंगचे काम सुरू असताना शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. तपासानंतरच नेमकी आग कशामुळे लागली हे स्पष्ट होणार आहे. यानंतर योग्य ती कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. कंपनीचे मालक निकुंज शहा यांना त्यांच्या पुण्यातील घरातून ताब्यात घेण्यात आले आहे. कंपनीला अचानक आग लागल्याने स्थानिकांनी ती विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अग्निशामक दलाचे बंबही तेथे आले. मात्र, रस्ते लहान असल्याने गाड्यांना आत जाता आले नाही. यामुळे जेसीबीच्या साह्याने कंपनीची भिंत फोडून आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले. रात्री उशिरा पर्यंत आग विझवण्याचे कार्य सुरू होते.