पुणे : परराज्यातील इंजिनिअरिंगची पदवी घेतली असल्याचे दाखवून महापालिकेत कनिष्ठ अभियंतापदी बढती घेतलेल्या कर्मचाऱ्यांची सविस्तर चौकशी करून, त्याचा अहवाल स्थायी समितीसमोर मांडला जाईल, असे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी सांगितले.परराज्यातील मान्यता नसलेल्या विद्यापीठाच्या पदव्या घेऊन काही शिपाई, गवंडीकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी बढती घेतली असल्याबाबत स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी प्रशासनाकडे विचारणा केली. नवीन सेवा प्रवेश नियमावलीनुसार महापालिका प्रशासनाने चतुर्थ श्रेणीतील २५ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ अभियंतापदी पदोन्नती दिली आहे. यामध्ये गवंडी, बिगारी, शिपाई अशा संवर्गातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे; मात्र यामधील दहा कर्मचाऱ्यांनी पदोन्नती मिळविण्यातील परराज्यातील विद्यापीठांच्या स्टडी सेंटरच्या माध्यमातून मिळविलेल्या पदव्या जोडल्या आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने मात्र आभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमासाठी या विद्यापीठांना परवानगी देण्यात आली नसल्याचे पत्र महापालिका प्रशासनाला पाठविले आहे. स्थायी समितीच्या बैठकीत सदस्य अविनाश बागवे यांनी या पदव्यांबाबत प्रशासनाकडे विचारणा केली. महाराष्ट्र टेक्निकल बोर्डाची (एआयसीटी) व युजीसीची मान्यता नसताना, प्रशासनाने त्याला मान्यता कशी दिली? बोगस पदव्या घेऊन अभियंता होऊन शहराचे प्रकल्प हाताळणार असतील, तर स्मार्ट सिटी कशी होणार, असा प्रश्न बागवे यांनी उपस्थित केला. त्यावर याप्रकरणाची सविस्तर चौकशी करून, अहवाल ठेवला जाईल, असे ओमप्रकाश बकोरिया यांनी स्पष्ट केले.
परराज्यातील पदव्या घेऊन इंजिनिअर बनलेल्यांची चौकशी
By admin | Updated: November 4, 2015 04:13 IST