पुणे : महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या कारभारात अनागोंदी असून त्यावर मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होऊनही उपाययोजना झाली नाही. या प्रकरणी घनकचरा विभागाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. कचऱ्यापासून वीज व गॅस निर्मिती प्रकल्पांवर होणारा भांडवली खर्च किती? त्यांची क्षमता किती? तेथे किती कचरा जातो? या प्रकल्पांवर केला जाणारा आवर्ती खर्च किती? हे सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालतात का? ते अधिक क्षमतेने चालावेत, यासाठी पालिकेतर्फे काय खबरदारी घेतली जाते? यासारखे अनेक प्रश्न कचऱ्याच्या वारंवार उद्भवणाऱ्या समस्येमुळे निर्माण झाले आहेत. त्यावर पालिकेने आजवर कधीही सविस्तर खुलासा केलेला नाही. पालिकेच्या घनकचरा विभागातर्फे गेल्या काही वर्षांत कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी खत, वीज व गॅस निर्मितीचे अनेक प्रकल्प उभे राहिले. तरी, प्रत्यक्षात ते पूर्ण क्षमतेने सुरू नसतानाही सर्वसामान्य करदात्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच शहरातील कचऱ्याचेही प्रमाणही पैसे उकळण्यासाठी जास्त दाखविले जात असल्याचा आरोप जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केला आहे. पालकमंत्र्यांनीही त्याबाबत नुकताच आक्षेप नोंदविला असल्याने घनकचरा विभागाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी केली जावी, अशी मागणी शहरातील स्वयंसेवी संस्थांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. कचऱ्याशी अनेक प्रश्न निगडित असल्याने महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनाची श्वेतपत्रिकाजाहीर करावी, अशी मागणी सुराज्य संघर्ष समितीचे अध्यक्ष विजय कुंभार यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)४कचऱ्यापासून वीज व गॅस निर्मितीचे प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याबाबत पालिका आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती; पण त्याची दखल घेण्यात गेली नाही. ४एकूणच कारभारात अनागोंदी आहे. याबाबत घनकचरा विभागाची लाचलुचपत विभागामार्फत सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर, विश्वास सहस्रबुद्धे व नागरिक चेतना मंचचे मेजर जनरल एस. सी. एन. जठार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
घनकचरा विभागाची चौकशी करा
By admin | Updated: January 7, 2015 00:46 IST