कुरुळी : इंद्रायणी नदीवर जलपर्णीचे मोठ्या प्रमाणावर साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे प्रदूषणाला पिंपरी-चिंचवड मनपाच जबाबदार असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने थोड्या प्रमाणात असणारी जलपर्णी काढली, तर पुढील काळात इंद्रायणी जलपर्णीमुक्त होईल.इंद्रायणी नदी एके काळी खेड-हवेली तालुक्याची जीवनदायिनी म्हणून ओळखली जात होती. मात्र, याच जीवनदायिनीला सध्या काळ्या पाण्याची शिक्षा मिळत आहेत. नदीपात्रातील दुर्गंधीमुळे नदीतील जलचर व नदीकाठावरील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नदीपात्रात सोडलेली गटारे कधी बंद केली जाणार, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.नदीपात्र स्वच्छ व सुंदर असावे, अशी कल्पना या भागातील लोकप्रतिनिधींसह पालिका अधिकारी वेळोवेळी बोलतात. मात्र, अघाप कोणीही लक्ष दिले नाही. श्रीक्षेत्र देहूपासून आळंदी देवाचीपर्यंत इंद्रायणी नदीपात्रात ठिकठिकाणी सांडपाणी सोडण्यात आले, तर काही ठिकाणी शहरातून वाहणारे नाले यात सोडण्यात आले आहेत. यावर उपाययोजना करण्यापेक्षा नदीपात्रालगत भूमिगत गटारांची वाहिनी टाकली आहे. त्याचे चेंबर ठिकठिकाणी फुटून पाणी नदीपात्रात जात आहे. याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. रोज परिसरातील सांडपाणी, मैलामिश्रित रसायनयुक्त पाणी थेट नदीपात्रात मिसळते. सामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
इंद्रायणीला काळ्या पाण्याची शिक्षा!
By admin | Updated: January 28, 2017 00:08 IST