इंदापूर : इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतसंस्था मागील दहा वर्षांपासून ऑडिट वर्ग ''अ'' मध्ये असून, या पतसंस्थेच्या सभासदांना केवळ ९ टक्के व्याजदराने २० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पतसंस्था देणार आहे. असा ठराव सर्वानुमते मंजूर झाला आहे, अशी माहिती पतसंस्थेचे चेअरमन ज्ञानदेव चव्हाण व सचिव संजय लोहार यांनी दिली.
इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा पतसंस्थेचे चेअरमन ज्ञानदेव चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली शनिवार, दि. ४ सप्टेंबर रोजी संपन्न झाली. संचालक मंडळाने काटकसरीने कारभार करत सभासदांना ९ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून ९.२५ टक्के उच्चांकी लाभांश व सभेचा भत्ता सभा संपताच तत्काळ बँक खात्यावर जमा करून शिक्षण दिनानिमित्ताने अनोखी भेट दिली आहे.
ज्ञानदेव चव्हाण म्हणाले की, सर्वसमावेशकता, काटकसर, पारदर्शकतेच्या जोरावर संचालक मंडळाने पतसंस्थेची स्वभांडवलाकडे वाटचाल केली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ३३ कोटी रुपये १०. ५० टक्के व्याजाने घेऊन ९ टक्के व्याजदराने २० लाख कर्ज दिले जाते. तातडीचे कर्ज ५० हजार मिळते. शिक्षक कल्याण निधीतून मयत सभासदांच्या वारसांना आर्थिक मदत केली जाते. त्याचप्रमाणे गंभीर आजाराच्या उपचारासाठी तत्काळ ५० हजार दिले जातात. डीसीपीएसधारक शिक्षकांना वाढीव निधी दिला जातो.
सभेचे प्रास्तविक चेअरमन ज्ञानदेव चव्हाण यांनी केले. विषय पत्रिका वाचन सचिव संजय लोहार यांनी केले. याप्रसंगी माजी चेअरमन तथा संचालक ज्ञानदेव बागल, सुनील वाघ, हरिश काळेल, विलास शिंदे, संभाजी काळे, किरण म्हेत्रे, नितिन वाघमोडे , सुनंदा बोके, सुभाष भिटे, हनुमंत दराडे आदी संचालक उपस्थित होते. आभार व्हाईस चेअरमन वसंत फलफले यांनी मानले.
०५ इंदापूर सभा
इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षकांची पतसंस्थेच्या वार्षिक ऑनलाईन सर्वसाधारण सभेत उपस्थित सभासद व शिक्षक.