(रविकिरण सासवडे)
बारामती: रुंद वरंबा सरी पद्धत (बीबीएफ) पेरणी यंत्राबाबत असणाऱ्या गैरसमजुती अनाठायी आहेत. वास्तविक पाहता या पद्धतीमुळे पिकाची वाढ जोमदार होऊन उत्पादनात सर्वसाधारणपणे २५, तर ३० टक्के वाढ होते. तसेच, या पेरणी यंत्राद्वारे दोन्ही बाजूने सरी पाडण्यात येते. कमी पर्जन्यमानात या सऱ्यांमध्ये पावसाचे पाणी साठून जमिनीत मुरते. जमिनीत ओलावा अधिक काळ टिकून राहतो. तसेच अतिरिक्त पावसाच्या काळात या सऱ्यांमधून जास्तीच्या पाण्याचा निचरा होतो. त्यामुळे बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी करण्याचा सल्ला कृषितज्ज्ञांनी दिला आहे.
याबाबत माहिती देताना तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ म्हणाले की, बीबीएफ तंत्रज्ञान शेतकऱ्यांना अत्यंत उपयुक्त असले, तरी त्याच्या अवलंबाबाबत शेतकऱ्यांमध्ये काही गैरसमज आहेत. या पद्धतीतील सरीमुळे एक ओळ कमी होत असल्याने हेक्टरी झाडांची संख्या कमी होऊन उत्पादन कमी होते, असा शेतकऱ्यांचा समज आहे. वास्तविक पाहता या पद्धतीमुळे पिकाची वाढ जोमदार होऊन उत्पन्नामध्ये सर्वसाधारणपणे २५ ते ३० टक्के वाढ होते. उपलब्ध बीबीएफ पेरणी यंत्राच्या सहाय्याने आंतरपिकाची पेरणी करताना आंतरपिकाचे विशिष्ट प्रमाण राखण्यास अडचण येते. परंतु उपलब्ध बीबीएफ पेरणी यंत्रात आवश्यकतेप्रमाणे जोडणीमध्ये बदल करून आंतरपिकाचे विशिष्ट प्रमाण राखता येते. शेतकºयांनी जमिनीत वापसा आल्याशिवाय बीबीएफ पेरणी यंत्राद्वारे पेरणी करू नये. तसेच, पेरणीकरिता बीबीएफ पेरणी यंत्र उपलब्ध होत नसल्यास पारंपरिक पेरणी यंत्राच्याद्वारे पेरणी करून पेरणीपश्चात मृत सरी काढाव्यात, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
-------------------
बीबीएफ तंत्रज्ञानाची उपयुक्तता :
- खरीप हंगामात सोयाबीन, तूर, मूग, उडीद व मका या पिकांसाठी उपयुक्त,
- रब्बी हंगामात हरभरा पिकास बीबीएफ तंत्रज्ञान उपयुक्त आहे.
-विशेषत: जिरायती भागातील क्षेत्रात बीबीएफ तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी जास्त उपयुक्त आहे.
------------------------------
बीबीएफ वापराचे फायदे :
- बीबीएफ पेरणी यंत्राच्या सहाय्याने उतारास आडवी पेरणी केल्याने मूलस्थानी जलसंधारण होते.
- आंतरपीक पद्धतीचा अवलंब करून अधिकचे उत्पन्न घेणे शक्य होते.
- बीबीएफ पद्धतीने निविष्ठा खर्चात (बियाणे, खते, इ) २० ते २५ टक्के बचत होते.
- वरंब्यावर ओलावा टिकवून ठेवला जात असल्याने पर्जन्यमान खंडाच्या कालावधीत सुद्धा पाण्याचा ताणाची तीव्रता कमी होते.
- जास्त पर्जन्यमान झाल्यास या पद्धतीमधील सरीमधून अतिरिक्त पाणी वाहून जाण्यास मदत होते.
- पिकास मुबलक हवा, सूर्यप्रकाश मिळाल्याने पिकाची जोमदार वाढ होऊन पीक कीड-रोगास पीक बळी पडत नाही.
- पिकामध्ये आंतरमशागत करणे, उभ्या पिकात सरीमधून ट्रॅक्टर/मनुष्यचलीत फवारणीयंत्राद्वारे कीटकनाशक फवारणी करणे शक्य होते.
- या पद्धतीचा अवलंब केल्याने जमिनीची धूप कमी प्रमाणात होऊन सेंद्रिय कबार्चा ऱ्हास थांबल्याने जमिनीची जलधारण क्षमता वाढते. या पद्धतीमुळे जमिनीची सच्छिद्रता वाढून जमीन भुसभुशीत होते.
---------------------------------
बीबीएफ तंत्रज्ञान पेरणी पद्धत जिरायती भागासह ज्या ठिकाणी पाऊस जास्त आहे अशा भागात देखील फायदेशीर आहे. कमी पाऊस झाल्यास सरीमध्ये पावसाचे पाणी जमा होऊन जमिनीत मुरले जाते. तर पाऊसकाळ जास्त असल्यास शेतातून अतिरिक्त पाणी वाहून जाण्यास मदत होते. सोयाबिन, तूर, उडीद अशा पिकांसाठी ही पद्धत उपयोगी आहे. त्यामुळे अतिरिक्त पाऊसकाळात या कडधान्यांचे नुकसान टळते.
- संतोष करंजे
पीक तज्ज्ञ कृषी विज्ञान केंद्र, बारामती
माळेगाव येथे बीबीएफ यंत्राच्या सहाय्याने पेरणी प्रात्यक्षिक दाखवताना कृषी विभागाचे अधिकारी व शेतकरी.
०७०६२०२१-बारामती-०१