राहू : देवकरवाडी (ता. दौंड) येथील हनुमान विद्यालयात शौचालय नसल्याने विद्यार्थ्यांची कुचंबणा होत आहे. या विद्यालयात तत्काळ शौचालयाचे युनिट उभारण्यात यावे अशी मागणी विद्यार्थीवर्गातून पुढे आली आहे. हनुमान विद्यालय हे राहू येथील कैलास विद्या मंदिराची एकमेव शाखा आहे. हनुमान विद्यालय १९९१मध्ये सुरू होऊन २६ वर्षांचा कालावधी लोटला तरी या शाळेतील विद्यार्थिनींना असुरक्षित ठिकाणी उघड्यावर शौचास जावे लागत आहे. परिणामी विद्यार्थिनींसह पालकवर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे. या विद्यालयाला इमारत नसल्याने येथील विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था ग्रामपंचायत कार्यालय व सार्वजनिक ठिकाणी करावी लागत असल्याची एकंदरीत परिस्थिती आहे. शाळेच्या इमारतीसाठी लोकवर्गणीतून दोन एकराच्या जवळपास जागा खरेदी केली होती.परंतु ही जागा वापराविना पडून असून या जागेवर इमारत उभी करण्याची गरज आहे. याच भागातील काही विद्यार्थी खामगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेत शिक्षण घेण्यासाठी जात आहेत.याबाबत देवकरवाडी गावचे ग्रामपंचायत सदस्य कांतिलाल देवकर म्हणाले, की २६ वर्षांत संस्थाचालक आणि त्यांच्या संचालक मंडळाने संस्थेच्या इमारतीच्या बांधकामाविषयी तर सोडाच परंतु साधे शौचालयही बांधले नाही ही दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे गावाला एकत्र बसून संस्थेच्या भल्यासाठी योग्य निर्णय घ्यावा लागेल.
शौचालय नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय
By admin | Updated: February 18, 2017 02:41 IST