इको बाप्पा मूर्ती प्रदान सोहळ्यास प्रारंभ
पुणे : पुण्याचा गणेशोत्सव हा जगभरात प्रसिद्ध आहे. इकोफ्रेंडली गणपती बसवण्याची सुरूवात पुण्यात झाली, तर त्यांचे अनुकरण इतरत्र नक्कीच केले जाईल. त्यादृष्टीने आपण पावले उचलली पाहिजेत, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी केले.
कोहिनूरच्या वतीने नदी व पर्यावरण रक्षणासाठी 'इको बाप्पा' प्रदान सोहळा शनिवारी पार पडला. यावेळी पर्यावरण रक्षणास हातभार लावण्याऱ्या 'इको बाप्पाप्रेमींना' शाडूच्या मूर्ती प्रदान करण्यात आल्या. याप्रसंगी उद्योजक कृष्णकुमार गोयल, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, संयोजक वीरेंद्र चित्राव, नयनीक्ष देशपांडे, सुवर्णा भांबुरकर आदी उपस्थित होते. या उपक्रमाअंतर्गत पेण येथील कलाकारांनी तयार केलेल्या सुबक इकोफ्रेंडली गणेशमूर्ती बॅकस्टेज कलाकार विनामूल्य पूजा साहित्य किटसह घरोघरी पोहचवणार आहेत.
मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, या उपक्रमाच्या माध्यमातून पेणच्या कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध होत आहे. इकोफ्रेंडली बाप्पा असल्याने आपल्या सर्वांच्या मनावर एक चांगला संस्कार होईल. तसेच या मूर्ती बॅकस्टेज कलाकारांच्या हस्ते दिल्या जाणार असल्याने एक कलाकार म्हणून मला खूप आनंद होत आहे. ज्या प्रमाणे कोरोनाने आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या. तसेच हा बाप्पादेखील आपल्याला अनेक नव्या गोष्टी शिकवेल.
गोयल म्हणाले, कोरोनामुळे रोजगार गमावलेल्या पडद्यामागच्या कलाकारांच्या हाताला काम मिळेल. नुकतेच कोल्हापूर, रायगड आदी ठिकाणी पुरामुळे हाहाकार माजला होता. अतोनात नुकसान झाले. तेथील लोकांनाही यामुळे आर्थिक साहाय्य मिळेल.
रासने म्हणाले, सगळ्या चांगल्या चळवळी या पुण्यातूनच सुरू झाल्या असून, त्या यशस्वी ही झाल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून करोनाच्या प्रादुर्भावात आपण सर्व आहोत. मात्र विघ्नहर्त्याच्या उत्सवात बॅकस्टेज कलाकारांच्या मदतीला तोच विघ्नहर्ता धावून आला आहे.
चित्राव म्हणाले, पर्यावरण पूरक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम असा उपक्रम मागील वर्षी आम्ही सुरू केला. त्याला हैदराबाद, बंगळुरू, सातारा, मुंबई, ठाणे आदी जवळपास २० ठिकाणांहून मागणी आहे. दोनच वर्षात एखादा उपक्रम चळवळीचे स्वरूप प्राप्त करतो याचे हा उपक्रम एक उत्तम उदाहरण आहे.
चित्रा भिसे यांनी सूत्रसंचालन केले.