लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पुणे शाखेने २०२० मधील उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रीय स्तरावरील दोन आणि विभागीय स्तरावरील (वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल - डब्ल्यूआयआरसी) दोन पुरस्कार अशा एकूण चार पुरस्कारांवर मोहोर उमटवली.
राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम शाखा व सर्वोत्तम विद्यार्थी (वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट्स स्टुडंट्स असोसिएशन- विकासा) शाखेचा द्वितीय, तर विभागीय स्तरावर प्रथम पुरस्कार आयसीएआयच्या पुणे शाखेला मिळाला.
नुकत्याच झालेल्या वार्षिक समारंभात राज्यसभा खासदार सीए अरुण सिंग व ‘आयसीएआय’चे अध्यक्ष सीए अतुलकुमार गुप्ता, माजी अध्यक्ष सीए प्रफुल्ल छाजेड यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण झाले. आयसीएआय पुणे शाखेचे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे (२०२०-२१), ‘विकासा पुणे’चे अध्यक्ष सीए समीर लड्डा, सचिव-खजिनदार सीए काशिनाथ पठारे यांनी हे चारही पुरस्कार स्वीकारले. यावेळी ‘आयसीएआय'च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, ‘डब्ल्यूआयआरसी’चे अध्यक्ष सीए ललित बजाज, खजिनदार सीए आनंद जाखोटिया, विभागीय समितीचे सदस्य यशवंत कासार आदी उपस्थित होते.
आयसीएआय पुणे शाखेचे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे, ‘विकासा पुणे’चे अध्यक्ष सीए समीर लड्डा, सचिव-खजिनदार सीए काशिनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली हे यश मिळाले. सीए धामणे म्हणाले, “वर्षभर आयसीएआय पुणे शाखेने ‘३ आय’ अर्थात इमेज (प्रतिमा), इंटलेक्ट (बुद्धिमत्ता) आणि इन्फ्रास्ट्रक्चर(पायाभूत सुविधा) या संकल्पनेवर काम केले. हे पुरस्कार ‘आयसीएआय’ पुणे शाखांमधील सर्व सदस्य, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना समर्पित करतो.”