ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 5 - कात्रज येथील दत्तनगरमधील टेल्को कॉलनीमध्ये एका तरुणाने आपल्या पत्नीसह दोन मुलींची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे. दीपक सकारी हांडे (वय 42) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. त्याने पत्नी स्वाती (वय 35), मुलगी तेजस (वय 16) आणि वैष्णवी (वय 12, सर्व रा. टेल्को कॉलनी, दत्तनगर, कात्रज) यांचा खून केला आहे. दीपक हा संत तुकाराम साखर कारखान्यामध्ये नोकरी करीत होता. त्याने लिहून ठेवलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामध्ये बऱ्याच देणेक-यांची नावे लिहून ठेवलेली आहेत. तसेच आम्ही जातोय, आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये, असे लिहून ठेवले आहे. वरिष्ठ निरीक्षक विजयसिंह गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक हा मूळचा संगमनेरचा आहे. नोकरीनिमित्त तो पुण्यात राहत होता. साधारणपणे पहाटे पाचच्या सुमारास त्याने बेडरूममध्ये झोपलेल्या पत्नी आणि मुलगी वैष्णवी हिचा गळा आवळून खून केला. त्यांनतर हॉलमध्ये बेडवर झोपलेल्या तेजसचा खून केला. नंतर दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली. घटनास्थळी धाव घेतली असता घरचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. दरवाजा तोडून पोलिसांनी आतमध्ये प्रवेश केला असता हॉलमध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दीपकचा मृतदेह आढळून आला. तर बेडवर तेजस आणि बेडरूममध्ये वैष्णवी व स्वाती यांचे मृतदेह दिसले. या घटनेमुळे कात्रज परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सर्व मृतदेह ससून रुग्णालयात हलवण्यात आले आहेत.
पुण्यामध्ये पत्नी आणि मुलींचा खून करून पतीची आत्महत्या
By admin | Updated: February 5, 2017 12:49 IST