जयवंत गंधाले ल्ल हडपसरफुरसुंगी येथील हंजर प्रकल्प बंद पडल्याने कंपनीचे संचालक निघून गेले. मात्र, पोटासाठी परराज्यातून येऊन प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. आरोग्य धोक्यात घालून काम करणाऱ्या कामगारांना कंपनी व महापालिकेने वाऱ्यावर सोडले आहे. गेल्या २२ वर्षांपासून शहरातील कचरा उरुळी देवाची व फुरसुंगी येथे टाकला जात आहे. त्या ठिकाणी कचरा प्रक्रियेसाठी कोट्यवधी रुपये खर्चून हंजर प्रकल्प उभारण्यात आला होता. कचऱ्याच्या ठिकाणी काम करण्यास स्थानिक कामगार तयार नसल्याने परराज्यांतून मोठ्या प्रमाणात कामगार येथे आणण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून हे कामगार २४ तास प्रकल्पाजवळच्या पत्र्याच्या शेडमध्ये दुर्गंधीत राहून काम करीत आहेत. काही दिवसांपासून प्रक्रिया प्रकल्प बंद आहे, त्यामुळे आजूबाजूचा परिसर अधिक दुर्गंधीयुक्त बनला आहे. कचऱ्यातून वाहणारे लिचेड सगळ्या रस्त्यावर पसरलेले आहे, त्यामुळे माश्यांचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परराज्यांतून चार पैसे मिळविण्याच्या हेतूने आलेल्या कामगारांना पोटासाठी अशा कचऱ्यात काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. शिवाय कचऱ्यात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक असल्याने कचऱ्याची विल्हेवाट लावणे अडचणीचे ठरत आहे. सध्या कचऱ्यात काम करणाऱ्या कामगारांना कोणी वाली राहिलेले नाही. ४तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कचरा आंदोलनासाठी मध्यस्थी केली. त्यानंतर नवीन सरकारमधील पालकमंत्री गिरीश बापट व जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या शिष्टाईनंतरही तोडगा निघालेला नाही, त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न ‘जैसे थे’ असून, स्थानिक नागरिक व कामगारांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
कचरा कामगारांवर उपासमार
By admin | Updated: January 6, 2015 00:13 IST