पुणे : पोलिसांना सुट्टीच्या दिवशी काम केल्यास एक दिवसाचा पगार देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. परंतु त्याची अंमलबजावणी मात्र सुरू करण्यात आली नव्हती. पोलिसांना अद्यापही जुन्याच दराने भत्ता देण्यात येत असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने मांडले होते. सुट्टीच्या दिवशी काम करणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या पगाराच्या पटीत भत्ता देण्याचा आदेश शासनाने गुरुवारी जारी केला असून, या निर्णयामुळे लाखो पोलिसांना दिलासा मिळाला आहे.राज्यातील पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे आहे. राज्यातील वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरण, औद्योगिक भरभराट तसेच धार्मिक सण, राजकीय सभा, कार्यक्रम, निवडणुका, आंदोलने, दंगली, व्हीआयपी दौरे आदी घटनांवेळी पोलिसांच्या हक्काच्या सुट्ट्या रद्द केल्या जातात. यासोबतच त्यांना १२ तासांपेक्षा अधिक काळ ड्युटी करावी लागते. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कायमच बंदोबस्तामध्ये उभे असतात. अनेकदा वैद्यकीय कारणास्तव तसेच कौटुंबिक अडचणीच्या वेळीही पोलिसांना सुट्ट्या घेता येत नाहीत. सुट्टीच्या दिवशी काम केल्यास पोलिसांना भत्ता दिला जातो. दिवसभर काम केल्यानंतर ६० ते ९० रुपयांपर्यंतचा भत्ता दिवसभरासाठी देण्यात येत असल्यामुळे पोलिसांमध्ये नाराजी होती. (प्रतिनिधी)
पोलिसांना हक्काच्या सुट्टीचा पगार
By admin | Updated: August 7, 2015 00:20 IST