कुरकुंभ : खडकी-रावणगाव या दोन वेगवेगळ्या गावांतील ग्रामस्थांनी पुणे-सोलापूर महामार्गावर पाण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करून तब्बल दीड तास महामार्ग रोखला. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. खडकी परिसर सध्या दुष्काळाच्या भीषण स्थितीला सामोरे जात असताना खडकवासला धरणामधील दौंड-इंदापूरसाठी सोडण्यात आलेल्या पाण्यामधून खडकी परिसरातील ओढ्यामध्ये पाणी सोडण्याची मागणी प्रांताधिकारी यांनी मान्य केली असतानादेखील स्थानिक पाटबंधारे अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे फक्त दहा टक्केच पाणी मिळाले आहे. याबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पाण्यासाठी संघर्ष हा अटळ असून त्यासाठी रास्ता रोको करून पाणी मिळवण्यापलीकडे सध्या काहीच पर्याय उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना रस्त्यावर उतरावे लागत आहे. पाटबंधारे विभागाने याची दखल वेळीच घेणे गरजेचे आहे. मात्र अधिकारी गंभीर नसल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करीत आहे. या आंदोलनात खडकीचे सरपंच किरण काळे, उपसरपंच विकास शितोळे, भीमा पाटसचे संचालक महेश शितोळे, भानुकाका शितोळे, संदीप लगड, शरद सूर्यवंशी, मच्छिंद्र काळभोर, गणपत काळभोर, भाऊसाहेब निंबाळकर तसेच ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते. खडकी परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत चारी क्रमांक ३२, ३५ मधून पाणी सोडण्याबाबत निर्णय झाला होता. मात्र, पाटबंधारे अधिकारी जाणूनबुजून पाणी सोडण्यात कुचराई करत असून ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्याची भाषा करीत आहेत - किरण काळे, सरपंच, खडकी
पाण्यासाठी दीड तास रोखला महामार्ग
By admin | Updated: February 15, 2016 01:39 IST