तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे अ. भा. मराठी नाट्य परिषद शाखेच्या ‘हॅलो ब्रदर्स’ने राज्य बालनाट्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत प्रथम क्रमांक मिळविला. नांदेड येथे होणाऱ्या दुसऱ्या बालनाट्य संमेलनात सादरीकरणाचा मान या नाटकास मिळाला आहे.स्पर्धेच्या पुणे व कोल्हापूर केंद्रात झालेल्या प्राथमिक ६३ नाटकांमधून नाट्य परिषद तळेगाव शाखेने सादर केलेल्या नयना डोळसलिखित ‘हॅलो ब्रदर्स’ या नाटकाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. या बालनाट्यास सांघिक पारितोषिकासह दिग्दर्शन, नेपथ्य ( क्षिप्रसाधन भरड), रंगभूषा (मंगल चव्हाण) ही प्रथम पारितोषिके मिळाली. अभिनयासाठी श्रद्धा भांगरे यांना प्रमाणपत्र मिळाले. हे नाटक आपल्याला समुद्र तळाची सफर घडवून आणते आणि मानवांनी केलेल्या प्रदूषणामुळे भोगाव्या लागणाऱ्या जलचरांच्या व्यथा सांगते. कसदार लेखन, नेत्रदीपक नेपथ्य, अप्रतिम वेशभूषा, रंगभूषा आणि समुद्र तळाचा आभास निर्माण करणारी प्रकाश योजना प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते. यापूर्वी तळेगाव दाभाडेतून २००६ साली कलापिनीचे ‘झेप घे रे’ हे नाटक अंतिम फेरीसाठी निवडले गेले होते. दहा वर्षांनंतर हा मान तळेगाव दाभाडे शाखेने मिळविला आहे. तळेगावातील रंगकर्मी आणि मान्यवरांकडून नाट्य परिषदेच्या तळेगाव शाखेचे अभिनंदन करण्यात येत आहे.‘हॅलो ब्रदर्स’ हे नाटक ६ जानेवारी २०१७ रोजी नांदेड येथे होणाऱ्या अंतिम फेरीत सादर होणार आहे. त्याचप्रमाणे नाट्य परिषदेच्या नांदेड येथे होणाऱ्या दुसऱ्या बालनाट्य संमेलनामध्ये या नाटकाचे पाच प्रयोग मुख्य रंगमंचावर सादर होणार आहेत. नाटकाच्या यशाचे श्रेय नाटकाच्या लेखिका नयना डोळस, दिग्दर्शक क्षिप्रसाधन भरड आणि टीमचे असल्याचे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी सांगितले. (वार्ताहर)
प्राथमिक फेरीत ‘हॅलो ब्रदर्स’ प्रथम
By admin | Updated: December 26, 2016 02:54 IST