चिंचवड : ढोल-ताशाचा गजर, फुलांची उधळण आणि मोरया, मोरयाचा गरज करीत लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी आलेल्या गणेशभक्तांनी चिंचवड परिसर फुलून गेला. घरगुती गणेशमूर्तींबरोबरच सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला. ११ तासांनी चिंचवडमधील मिरवणुकीची सांगता झाली. चिंचवडमधील थेरगाव घाट व मोरया गोसावी मंदिर परिसरातील घाटावर सकाळपासूनच घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन सुरू होते. दोन्ही घाटावर चोख पोलीस बंदोबस्त व वाहतुकीची नियोजनात पोलीस अधिकारी कर्मचारी व्यक्त होते. सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांनी विसर्जन मिरवणुकीत सेवा दिल्याने चिंचवडमधील विसर्जन मिरवणूक मोठ्या भक्तीभावाने व शांततेत पार पडली.चापेकर चौकात महानगरपालिकेच्या वतीने स्वागत कक्षाची उभारणी करण्यात आली होती. दुपारी १ वाजल्यापासून मंडळाच्या मिरवणुकांना सुरूवात झाली. परंतु रात्री आठवाजेपर्यंत विसर्जनासाठी येणाऱ्या मंडळांचे प्रमाण कमी होते. सायंकाळी या स्वागत कक्षात महानगरपालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांच्यासह क्षेत्रीय अधिकारी सुभाष माचरे, प्रशासन अधिकारी बी. टी. बोराडे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी महापौर अपर्णा डोके, शमीम पठाण, अश्विनी चिंचवडे, आशा सूर्यवंशी, शितल ऊर्फ विजय शिंदे, अॅड. संदीप चिंचवडे, गणेश लोंढे, नीलेश बारणे, अनंत कोराळे, माजी नगरसेवक नाना काटे आदी मान्यवर उपस्थित होते. मंडळाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना श्रीफळ, पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.विसर्जन घाटावर मूर्तीदान उपक्रमासाठी संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ३० कार्यकर्ते भाविकांना हौदात मूर्तीदान करण्याचे आवाहन करीत होते. अनेक भाविकांनी येथील हौदात मूर्ती विसर्जन केले. नदीपात्रात दरवर्षीपेक्षा पाण्याची क्षमता जास्त असल्याने नदीतील वाहत्या पाण्यात विसर्जनासाठी गर्दी होती. घाटावर पोलीस कर्मचारी , अग्निशामक दलाचे जवान व पालिका कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.दुपारी १ वाजून ४० मिनिटांनी मिरवणूक सुरू झाली. केशवनगरातील गिरीमा मित्रमंडळ, चापेकर चौकात आले. यानंतर गणराज मित्रमंडळ, बालतरुण मंडळ, काकडे, ड्रिस्ट्यूबुट्यर , विलास भोसले मंडळ, गिरीजात्मक मित्र मंडळ, संभाजीराजे युवा प्रतिष्ठान, ओंकार गणेश मंडळ, हनुमान मित्र मंडळ, स्वराज्य मित्र मंडळ, संतोषी माता प्रतिष्ठान, श्रीराम मित्र मंडळ, अजिंक्य मित्र मंडळ, काकडे पार्क मित्र मंडळ, साईबाबा मित्र मंडळ या मंडळांनी सायंकाळी साडेसहापर्यंत विसर्जन केले. सायंकाळी साडेसहा नंतर काही नामांकित मंडळांचे गणपती चौकात दाखल झाले. चिंचवडचा राजा म्हणून ओळखल्या जाणारे संत ज्ञानेश्वर मित्रमंडळ ढोलताशांचा गजर करीत चौकात आले. पांढऱ्या टोप्या परिधान केलेले कार्यकर्ते व गणरायासाठी केलेली आकर्षक सजावट लक्षवेधी ठरली. या पाठोपाठ समर्थ मित्र मंडळ, श्रीराम मित्र मंडळांनी उत्साहात गणेश विजर्सन मिरवणुका काढल्या. थेरगाव येथील शिवतेज मित्रमंडळाने जेजुरी गडाचा देखावा साकारला होता. यानंतर पुन्हा चापेकर चौकात शांतता पसरली. साठेआठ वाजता क्रांतिवीर भगतसिंग मित्रमंडळाची विसर्जन मिरवणूक दाखल झाली. १५ वर्षांची परंपरा मंडळाने अखंड ठेवत पालखीतून गणेश विसर्जनाची तयारी केली होती. पालखीत विराजमान गणरायाला निरोप देण्यासाठी मंडळातील कार्यकर्ते व महिलांचा सहभाग अधिक होता.ढोलताशांच्या गजर व सुंदर फुलांची सजावट लक्षवेधी ठरली. मानाचा गणपती म्हणून ओळख असणाऱ्या श्री दत्त मित्र मंडळाने पारंपरिक ढोलताशांचा गजर करीत गणरायाला निरोप दिला. गणेशमूर्ती भोवती फुलांची आरास केली होती. गांधीपेठ तालीम मंडळाने आगमन झाले. ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या माध्यमातून आपला खेळ सादर केला. मंडळाने यंदा विसर्जनासाठी मयूर रथ हा देखावा उभारला होता. हा देखावा भाविकांची दाद घेऊन गेला. ताथवडे येथील ८० वर्षांच्या मारुती बोरसे यांनी आगीचे चित्तथरारक प्रयोग सादर केले. या खेळाला उपस्थितांनी दाद दिली. अनेकांनी कौतुक करून रोख बक्षीसे दिली. (वार्ताहर)
गुलालविरहित मिरवणूक
By admin | Updated: September 10, 2014 00:42 IST