पुणे : थंडीमुळे फळभाज्यांच्या उत्पादनात घट झाल्याने रविवारी बहुतेक भाज्यांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत कमी झाली. त्यामुळे हिरवी मिरची, वांगी, गवार, काकडी, दोडका, फ्लॉवर, घेवडा या भाज्यांच्या भावात वाढ झाली. गुलटकेडी येथील मार्केट यार्डात रविवारी १५० ते १६० ट्रक शेतमालाची आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत सुमारे २० ट्रकने आवक कमी झाली आहे. मागील काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढल्याने भाज्यांच्या वाढीवर परिणाम जाणवू लागला आहे. परिणामी बाजारात बहुतेक भाज्यांची आवक घटली आहे.पालेभाज्यांमध्ये बहुतेक भाज्यांचे भाव स्थिर राहिले. रविवारी बाजारात कोथिंबिरीची आवक सुमारे १.७५ लाख तर मेथीची सुमारे ७० हजार जुडी आवक झाली.रविवारी बाजारात परराज्यातून जबलपूर येथून सुमारे २७ ते २८ ट्रक मटार, गुजरात व कर्नाटकातून ४ ते ५ ट्रक कोबी, कर्नाटक व मध्य प्रदेशातून १६ ते १७ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक येथून १ टेम्पो तोतापुरी कैरीची आवक झाली. तर इंदूर, आग्रा व स्थानिक भागातील तळेगाव येथून सुमारे ३० ते ३५ ट्रक बटाटा आणि मध्य प्रदेशातून सुमारे ४ हजार गोणी लसणाची आवक झाली. स्थानिक भागातून सुमारे २ हजार गोणी सातारी आले, ५.५ ते ६ हजार पेटी टोमॅटो, १५ ते १६ टेम्पो फ्लॉवर, सुमारे १८ ते २० टेम्पो कोबी, सुमारे ५०० गोणी मटार, ५ ते ६ टेम्पो पावटा आणि ७० ते ७५ ट्रक कांद्याची आवक झाली.
हिरवी मिरची, वांगी, गवारच्या भावात वाढ
By admin | Updated: December 26, 2016 02:38 IST