पुणे : भारत देश हा फक्त एक राजकीय विभाग असल्याचे ब्रिटिशांचे मत होते. मात्र, राजकारण हे आपल्या संस्कृतीच्या अष्टांगांपैकी केवळ एक अष्टांग आहे. जेव्हा जेव्हा या उदार संस्कृतीला धक्का लागला तेव्हा तेव्हा लोकोत्तर महापुरुषांनी भारतभ्रमण करून या राष्ट्राची एकात्मता पुन्हा सांधली. या परंपरेची उदाहरणे म्हणजे आद्य शंकराचार्य, समर्थ रामदासस्वामी व अगदी अलीकडे स्वामी विवेकानंद आहेत, असे प्रतिपादन विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी केले.आदित्य प्रतिष्ठान आयोजित ‘स्वामी विवेकानंद चरित्रकथन’ कार्यक्रमांतर्गत ‘स्वामी विवेकानंद यांनी पायी केलेले भारतभ्रमण’ या विषयावर ते बोलत होते.स्वामी विवेकानंदांच्या भारतभ्रमणाविषयी कथन करताना ते म्हणाले, ‘‘या सर्व परिक्रमेत भारतातील जनतेची तेव्हाची दयनीय अवस्था, ब्रिटिशांनी चालवलेलं शोषण, आपल्या संस्कृतीची होत असलेली अपरिमित हानी या गोष्टी पाहून स्वामीजींच्या मनाला अतीव यातना होत होत्या. त्यांचं अंत:करण राष्ट्राच्या या सर्वांगीण अभ्यासाने विशाल होत गेलं.खासदार अनिल शिरोळे व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ राम ताकवले उपस्थित होते. (प्रतिनिधी)
महापुरुषांनी राष्ट्राची एकात्मकता सांधली
By admin | Updated: January 24, 2017 02:31 IST