राज ठाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ओबीसी आरक्षणामुळे निवडणुकीला स्थगिती देऊन काही होणार नाही, त्याऐवजी केवळ महापालिकांवर प्रशासक नेमून सरकारचा उगीच फायदा व्हायला नको. त्यात काही तरी काळंबेरे असेल तर ते समजून घ्यायला हवे, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे करून सरकारचे सर्व उद्योगधंदे सुरू आहेत, अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.
राज्यात महापालिका निवडणुका न घेता त्याठिकाणी प्रशासक नेमून महापालिकांचा कारभार देखील आपल्या ताब्यात ठेवण्याचा कट सरकार आखत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. ते रविवारी पुण्यात बोलत होते. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणी आणि रणनिती आखण्यासाठी राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज पुण्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्याआधी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत महापालिका निवडणुका आणि कोविडच्या निर्बंधांवरुनही राज्य सरकारला लक्ष्य केले.
आगामी काळातील सणांवर घालण्यात आलेल्या निर्बंधाबाबत बोलताना राज ठाकरे यांनी सांगितले की, या सगळ्या लॉकडाऊनमध्ये त्यांच्या हे लक्षात आलंय की, जे चाललंय ते बरं चाललंय. कारण, कुठं आंदोलनं नाहीत, मोर्चे नाहीत, सरकारच्या विरोधात कुणी रस्त्यावर उतरायचं नाही. आपले आपले पैसे कमवा, आपली आपली दुकानं चालवा आणि बरं चाललंय सरकाराचं. नुसतं त्या कोरोनाची दुसरी लाट येणार, तिसरी लाट येणार, अशी भीती दाखवली जाते. हे कुठपर्यंत चालणार? असा सवालही राज यांनी उपस्थित केला आहे.
निवडणुकाबाबत ते म्हणाले की, राज्य सरकारलाच निवडणुका नको आहेत. निवडणूक घेण्याची सरकारचीच इच्छा नाही. याकडे आपण गांभीर्यानं पाहायला हवं. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे करून निवडणुका लांबणीवर टाकण्याचा राज्य सरकारचा घाट सुरू आहे. ओबीसी आरक्षण नसल्यामुळे निवडणुका स्थगित करण्याच्या निर्णयाला काहीच हरकत नाही. पण यामागे सरकारचं काही काळंबेरे असेल आणि आरक्षणाच्या मुद्द्याच्या आडून सरकार महापालिकांवर प्रशासक नेमून कारभार आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल तर याचा विचार आपण करायला हवा, असं राज ठाकरे यांनी सांगितले.
-----------------
ॲमेनिटी स्पेसवर भाष्य टाळले
पुणे शहरात सध्या ॲमेनिटी स्पेसचा मुद्दा गाजत आहे. यावर मनसेची भूमिका काय असे ठाकरे यांना विचारले असता त्यांनी माझ्या पदाधिकाऱ्यांशी बोललो आहे, असे सांगत त्यांनी यावर स्पष्टपणे बोलण्याचे टाळले.