पुणे : राज्य सरकारने सचिन वाझे यांना सातत्याने वाचविण्याचा प्रयत्न केला. सरकारने त्यांची एकप्रकारे वकिली केली. हे प्रकरण अतिशय गंभीर असून पोलीसच अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी होत असतील तर राज्यातील कायदा-सुव्यवस्था कशी टिकणार? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईमधील घरासमोर स्फोटके असलेली मोटार आढळून आल्यानंतर गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा खाडीमध्ये मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे. एनआयएकडून शनिवारी रात्री उशिरा सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी माध्यमांशी पुण्यात संवाद साधला.
फडणवीस म्हणाले, वाझे यांना वाचविण्यासाठी ‘ते काय ओसामा बिन लादेन आहेत की काय?’ अशी विधाने केली. परंतु, हे प्रकरण गंभीर असल्याने त्याच्या मुळाशी जाणे गरजेचे होते. त्यामुळेच मला प्राप्त झालेले पुरावे सभागृहात मांडले. पोलीस अधिकारीच असे काम करू लागले तर राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. एनआयएला तपासादरम्यान अनेक पुरावे मिळाले असून त्यानुसार कारवाई सुरू केली आहे. गुन्हा नेमका कशा प्रकारे घडला हे आता समोर आले आहे. या प्रकरणाचा एकच भाग समोर आला आहे. आणखी बरीचसी माहिती समोर येणे बाकी आहे. ही माहितीही समोर येईलच असे सूचक विधान फडणवीस यांनी केलं आहे.
मी मुख्यमंत्री असताना शिवसेनेच्या काही नेत्यांनी सचिन वाझे यांना सेवेत पुन्हा घेण्याचा आग्रह धरला होता. मात्र, मी तज्ज्ञांची या विषयावर चर्चा केली. वाझे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निलंबित असल्याचे मला सांगण्यात आले होते. परंतु, महाविकास आघाडी सरकारने कोरोनाचे निमित्त करून सचिन वाझे यांच्यासह काही निलंबित अधिकाऱ्यांना रुजू करून घेतले. वाझे यांना सेवेते घेण्याची, त्यांना मुंबईतील महत्त्वाच्या पदावर नेमण्याची सरकारला घाई का झाली होती, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
आरोपींना संरक्षण देणाऱ्यांना जाब विचारायला हवा
सचिन वाझे यांच्यापुरतेच हे प्रकरण मर्यादित नाही. कोण कोण यामध्ये सहभागी आहेत त्या सर्वांची चौकशी केली जावी. जे आज अटकेत आहेत तेच या प्रकरणाचे तपास अधिकारी होते ही गंभीर बाब आहे. त्यामुळे, त्यांच्या तपासावर विश्वास कसा ठेवणार? एवढे पुरावे समोर आल्यानंतरही जे मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखविला जातोय, महाराष्ट्र द्रोह वगैरे शब्दप्रयोग करणाऱ्यांनी एकदा आरशात पाहिले पाहिजे. एवढं भयानक कोणी वागत असेल तर त्यामधून मुंबई पोलिसांची प्रतिमा उजळते का, असा सवाल त्यांनी केला. राज्य खिळखिळे करण्याचा प्रयत्न असल्याचे वक्तव्य दूधखुळेपणाचे आणि हास्यास्पद असून आरोपींना संरक्षण देणाऱ्यांना याबाबत जाब विचारायला हवा असे फडणवीस म्हणाले.