पुणे : महापालिकेकडून दरमहा दोन लाख रुपयांचे अनुदान घेऊन चालविल्या जात असलेल्या अनाथ मुलांच्या घरटे प्रकल्पाची अवस्था अत्यंत दययनीय असल्याचे महिला व बाल कल्याण समितीने दिलेल्या अनपेक्षित भेटीमध्ये आढळून आले आहे. निकृष्ट अन्न, शौचालय व स्रानगृहांची दुरवस्था, मुलांची शारीरिक स्वच्छतेची वाईट अवस्था अशा अनेक चुकीच्या बाबी या भेटीमध्ये आढळून आल्या आहेत.येरवडा येथे जॉन पॉल स्लम डेव्हलपमेंट प्रोजेक्टअंतर्गत महापालिकेच्या अनुदानावर घरटे प्रकल्प चालविला जातो. रस्त्यावर सापडलेल्या, अनाथ मुलांचे संगोपन या प्रकल्पामध्ये केले जाते. महिला व बाल कल्याण समितीच्या सदस्यांनी या प्रकल्पाला १६ मे रोजी अचानक भेट दिली, त्या वेळी या प्रकल्पाचे कामकाज अत्यंत चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचे त्यांना दिसून आले. त्याबाबतच त्यांनी महापालिका आयुक्त, महापौर व पक्षनेत्यांकडे तक्रार केली आहे, अशी माहिती महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा उषा कळमकर यांनी दिली. या वेळी माधुरी सहस्रबुद्धे, मंजूषा नागपुरे, आशा साने उपस्थित होत्या.घरटे प्रकल्पातील धान्याच्या पिठामध्ये मोठ्या अळ्या दिसल्या; त्याचबरोबर भाज्या अत्यंत खराब स्थितीमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. मुलांना दिला जाणारा मांसाहार अत्यंत निकृष्ट व घाणेरडा वास येणारा होता. ते मांस अनेक दिवसांपासून फ्रिजमध्ये ठेवलेले आढळून आले. मुलांसाठी असलेले शौचालय व स्रानगृह अतिशय घाणेरडे व खराब अवस्थेत असल्याचे आढळून आले, अशी माहिती उषा कळमकर यांनी दिली. मुलांची शारीरिक स्वच्छतेची अवस्थादेखील वाईट होती. त्यांना आठवड्यातून केवळ दोनदा अंघोळ घातली जात असल्याचे मुलांनी सांगितले. मुलांचे केस, नखे खूप वाढलेली होती. त्यांच्या अंगावरील कपडे अत्यंत खराब होते. घरटे प्रकल्पाची ही दयनीय अवस्था पाहून समितीच्या सर्व सदस्या व्यथित झाल्या.लहान व कोवळ्या मुलांना अशा वाईट परिस्थितीत ठेवणाऱ्या घरटे प्रकल्प चालविणाऱ्या संस्थाचालकांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली जावी. संबंधित संस्थेकडील काम काढून घेऊन दुसऱ्या चांगल्या संस्थेकडे द्यावे, अशी मागणी महिला व बाल कल्याण समितीने केली आहे.रजिस्टरवर १४ जण हजर; प्रत्यक्षात एकच उपस्थितघरटे प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांपैकी १४ जण त्या दिवशी कामावर हजर असल्याची नोंद रजिस्टरमध्ये होती; मात्र प्रत्यक्षात एकच कामगार त्या वेळी उपस्थित होता. समितीच्या सदस्या आल्याची माहिती मिळताच त्यानंतर ३ कर्मचारी त्या ठिकाणी आले, अशी धक्कादायक माहिती समितीच्या सदस्यांनी दिली.लाईट नसल्याने अडचणसमितीचे सदस्य भेटीसाठी आले तेव्हा दिवसभर लाईट नव्हती; त्यामुळे भाजीपाला व मांस थोडेसे खराब झाल्याचे दिसून आले. महापालिकेने पूर्ण इमारतीपैकी केवळ खालचा मजला आम्हाला दिला आहे. परिसर मोठा असल्याने तिथे राडारोडा पडलेला आहे.- जॉर्ज स्वामी, संचालक जॉन पॉल स्लम डेव्हलपमेंट प्रोजेक्ट
महापालिकेच्या घरटे प्रकल्पाला लागलीय ‘घरघर’
By admin | Updated: May 27, 2016 04:48 IST