चाकण : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चाकणकरांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. एकीकडे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. कुजलेल्या कचऱ्याच्या दुर्गंधीबरोबरच गढूळ पाणीही येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.मुळातच चाकण परिसरात कमी दाबाने होणारा पिण्याचा पुरवठाही ही समस्या आहेच. त्यात गढूळ पाणीपुरवठा होऊ लागल्याने येथील नागरिक पुरते वैतागले आहेत. गेल्या तीन -चार दिवसांपासून हा पाणीपुरवठा होत आहे. चाकणला पाणीपुरवठा होणाऱ्या वाकी केटी बंधाऱ्यांच्या परिसरात पावसाचे पाणी साचत असल्याने चिखल मिश्रित गाळाचे प्रमाण अधिक होते. परिणामी जलवाहिनीद्वारे गढूळ पाणीपुरवठा होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण यंत्रणेचा विषय चव्हाट्यावर आला आहे. हे पाणी प्यायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नाईलाजाने पिण्यासाठी विकतचे पाणी घ्यावे लागते. यापुढे गढूळ पाणीपुरवठा होऊ नये याची काळजी घेतली जावी, अशी मागणी महिलांसह नागरिकांनी केली आहे. पाण्याचे शुद्धीकरण म्हणजे केवळ ब्लिचिंग पावडर जलकुंभांत टाकणे एवढेच काम होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. (वार्ताहर)
चाकणकर पिताहेत गढूळ पाणी!
By admin | Updated: August 15, 2014 01:13 IST