माहोल स्नेहसंमेलनाचा : मुलांना सादरीकरणारे व्हिडिओ पाठवण्याचे आवाहन
प्रज्ञा केळकर-सिंग
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नोव्हेंबर, डिसेंबर महिना म्हणजे शाळांमधील स्रेहसंमेलन, ख्रिसमस पार्टी आणि क्रीडा महोत्सवांचा माहोल! सादरीकरणाची तयारी, मुलांचा गोंधळ, शिक्षकांच्या सूचना अशी लगबग सुरु असते. यंदा कोरोनाच्या संकटामुळे आॅनलाईन शिक्षणाचा पर्याय स्वीकारावा लागला आहे. अनेक शाळांमध्ये आता गॅदरिंग, स्पर्धाही आॅनलाईन आयोजित करण्याची तयारी सुरु झाली आहे.
स्रेहसंमेलन म्हणजे चिमुरड्यांसाठी आनंदोत्सव असतो. आपल्यातील कलागुण सादर करण्याची ही नामी संधी असते. बहुतांश शाळांची स्नेहसंमेलने नोव्हेंबर ते जानेवारी या काळातच आयोजित केली जातात. यंदा कोरोनामुळे मुले घरीच बसून कंटाळली आहेत. उत्साहाचा माहोल ‘मिस’ करत आहेत. शाळांनी सुवर्णमध्य काढत शक्य तितके उपक्रम, स्पर्धा, सादरीकरण आॅनलाईन आयोजित करण्याचे नियोजन केले आहे.
नाट्यछटा, निबंध स्पर्धा, नृत्य, फॅन्सी ड्रेस, वक्तृत्व, सादरीकरण अशा विविध स्पर्धांसाठी शाळांकडून विषय देण्यात आले आहेत. त्या विषयाशी संबंधित सादरीकरण करुन तो व्हिडिओ संबंधित शिक्षकांकडे पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शाळेत प्रत्यक्ष येणे शक्य नसले तरी घरी बसून मुलांना आनंद मिळावा, त्यांच्यातील कलागुण सादर करण्याची संधी मिळावी, हा यामागील हेतू असल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात आले.
------------------
यंदा आॅनलाईन गॅदरिंगचे आयोजन केले जाणार आहे. मुलांना व्हिडिओ तयार करुन पाठवण्यास सांगण्यात आले आहे. एरव्ही गॅदरिंगमध्ये प्रत्येकाला वैयक्तिक कलागुण सादर करण्याची संधी मिळत नाही. यंदा ती संधी आॅनलाईन माध्यमामुळे प्राप्त झाली आहे. यामध्ये नाट्यछटा, भाषण, हस्तकला, चित्रकला, नृत्य असे वैविध्यपूर्ण उपक्रम आहेत. शाळेतर्फे काढले जाणारे ‘आनंदी’ हे मासिक यंदा ई-स्वरुपात प्रसिध्द होणार आहे. यामध्ये ‘पँडेमिक’ या विषयाशी संबंधित लेखन, कोडी, चित्रे मुलांना आणि पालकांना पाठवता येतील.
- रमा कुलकर्णी, मुख्याध्यापिका, पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक माध्यम, एसपीए स्कूल
-----------------------
वॉलनटमध्ये दर वर्षी दिवाळीपूर्वी ‘मस्ती की पाठशाला’, तसेच कार्निव्हल आयोजित केले जाते. यंदा ‘मस्ती की पाठशाला’चे आॅनलाईन आयोजन करण्यात आले होते. काही उपक्रम किंवा स्पर्धा एकत्र येऊनच करता येतात. त्यामुळे यंदा स्पर्धांचे, उपक्रमांचे स्वरुप बदलले आहे. इतर विषयांच्या तासाप्रमाणे गप्पांचा तासही आयोजित केला जातो. या तासात शिक्षक मुलांशी अवांतर विषयांवर गप्पा मारतात. त्यामुळे संवाद साधणे शक्य होते.
- अर्पिता करकरे, संचालिका, वॉलनट स्कूल
-----------------------