कोरेगाव भीमा : केवळ वृद्ध महिलांना सोन्याचे आमिष दाखवून अंगावरील सोने लुटणाऱ्या टोळीला शिक्रापूर पोलिसांनी नुकतेच सणसवाडीत रंगेहाथ पकडले. स्वत:ची इंडिका गाडी घेऊन फिरणारे हे चोरटे फिरून असेच धंदे करीत असल्याचे निष्पन्न झाले असून, पुढील तपासात मोठी टोळी हाताला लागण्याची चिन्हे आहेत. परमेश्वर ऊर्फ चमू राजेंद्र गायकवाड (वय २१), सुभाष विष्णू मरे (वय २७), पांडुरंग तुकाराम जाधव (वय २२, सर्व रा. लोनुती, ता. जि. लातूर) व उत्तम वामनराव मिरवले (वय ३५, रा. चेरा, ता. जळकोट, जि. लातूर) अशी या लुटारूंची नावे आहेत. त्यांच्यावर दरोड्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चौघेजण मिळून एखादी वृद्ध महिला टार्गेट करून तिच्या पुढे सोन्याची बिस्किटे टाकत. तिला भुलवून तिच्या अंगावरील सोने घेण्याची पद्धत असल्याचा गुन्हा यापूर्वी शिक्रापुरात घडला होता. त्याच अनुषंगाने शिक्रापूर पोलीस अशा चोरट्यांचा शोध घेतच होते. त्यातच एका खबऱ्याच्या माहितीनुसार चार चोरटे मंगळवारी रात्री सणसवाडीत संशयास्पदरीत्या फिरत असताना स्थानिक ग्रामस्थांना आढळले. पोलीस पथक रात्री अकरा वाजता या ठिकाणी पोहोचले. आरोपींची चौकशी केली असता, हे चौघेही गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात सोबतच्या गाडीत सर्वांचे बिछाने, कपडे आणि आवश्यक सर्व साहित्य घेऊनच ते फिरत असत. रस्त्यातील एकटी महिला शोधून तिच्यापुढे सोन्याची दोन बिस्किटे टाकून तिला प्रलोभन दाखवून अंगावरील दागिने द्यायला भाग पाडत असत. आमचा हाच धंदा असल्याचे या टोळीतील एकाने शिक्रापूर पोलिसांशी बोलताना सांगितले. तसेच, पुणे शहरातही बराच हात मारल्याचेही एका चोरट्याने सांगितले. (वार्ताहर)
वृद्ध महिलांना लुटणारे जेरबंद
By admin | Updated: February 11, 2016 03:02 IST