पुणे : धांगडधिंगा ही आपली संस्कृती नाही. जुन्या हिंदी चित्रपटांची नाळ ही शब्द आणि सुरांशी जोडलेली असल्याने जुन्या हिंदी चित्रपटांतील गाणी आजही अजरामर झाली आहेत, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांनी व्यक्त केले.गंधर्व आर्ट आणि एकता कराओके ग्रुपच्या वतीने २०व्या वर्धापनदिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘सुनहरी यादे’ हा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी डॉ. जोशी, ज्येष्ठ संगीतकार सुरेंद्र अकोलकर, गंधर्व आर्टचे संचालक विनोद कांबळे, सुनील वाघेला, रामदास गायकवाड आदी उपस्थित होते.पंचकलांमध्ये संगीत ही सर्वांत शुद्ध कला असून, ती माणसाला जीवनाचा विशुद्ध अनुभव देणारी आहे. त्यामुळे संगीत हे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, असेही जोशी यांनी नमूद केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा ‘ओल्ड इज गोल्ड’ हा नजराणा सादर करण्यात आला. त्यामध्ये ‘आइंए मेहरबा’, ‘रिमझीम गिरे सावन’, ‘चाँद की दिवार ना तोडी’, ‘छुप गये तारे नजारे’, ‘जाने कहाँ गये’ या लोकप्रिय गाण्यांना रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. (प्रतिनिधी)
धांगडधिंगा आपली संस्कृती नाही : जोशी
By admin | Updated: March 5, 2016 00:47 IST