पुणे : मेट्रोच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करण्यात आले आहेत, मेट्रोसाठी आर्थिक तरतूद तसेच इतर बाबींची कार्यवाही सध्या पार पाडली जात आहे. या सर्व प्रक्रिया पार पडून पुण्याच्या मेट्रोला केंद्रीय मंत्रिमंडळाची (कॅबिनेट) लवकरच मंजुरी मिळावी यासाठी आवश्यक तिथे मदत करेन, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून मेट्रोचा प्रश्न निकाली काढण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी दिल्लीत बैठक झाली. यात मेट्रो जमिनीवरून जाईल तसेच आवश्यकता असेल तिथे भुयारी मार्गाचा वापर करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे रखडलेल्या मेट्रो प्रकल्पाला गती मिळाली आहे. याबाबत नितीन गडकरी यांनी सांगितले की, ‘‘पुण्याचा मेट्रो प्रकल्प लवकर मार्गी लागावा यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल. नागपूर मेट्रोसाठी ज्या कंपनीने कर्ज उपलब्ध करून दिले त्यांनी पुणे मेट्रोसाठीही मदत करावी याबाबत बोललो आहे. महापालिका आयुक्तांनी आवश्यक त्या तांत्रिक बाबींची पूर्तता करावी, जिथे अडचण येईल तिथे मी लक्ष घालेन.’’ (प्रतिनिधी)
मेट्रोच्या मंजुरीसाठी मदत करेन : गडकरी
By admin | Updated: October 26, 2015 02:04 IST