पुणे : केंद्र शासनाचा नॅशनल एड्स कंट्रोल आॅर्गनायझेशन (नॅको) आणि राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेतर्फे चालविला जाणाऱ्या एड्स नियंत्रण निधीअभावी अनेक संस्थांचे काम बंद होण्याची वेळ आली अहे. चौथ्या टप्प्यातील या कार्यक्रमात एप्रिल २०१२ ते मार्च २०१७ या कालावधीसाठी देशातील सर्व राज्यांतील एड्स रोगावर नियंत्रण करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. केंद्राकडून हा निधी राज्य शासनाकडे पोहचविला जातो. त्यानंतर राज्य शासन त्यात आपल्या तरतुदीनुसार निधीची भर घालते. १ एप्रिल २०१५ पासून हा निधी शासनाकडून न मिळाल्याने आता पुढे हे नियंत्रणाचे काम कसे चालू ठेवायचे हा प्रश्न संस्थाचालकांपुढे उभा राहिला आहे. राज्यात चालू असणारे एड्स नियंत्रणाचे काम अशा पद्धतीने बंद करावे लागल्यास समाजात एड्स आणि गुप्तरोग संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याचे समपथिक ट्रस्टच्या बिंदुमाधव खिरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)-----------केंद्र आणि राज्य शासनाकडून येणाऱ्या निधीमध्ये कपात करण्यात आली आहे. त्यामुळे स्वयंसेवी संस्थांना एड्स नियंत्रण कार्यक्रमासाठी देण्यात येणारा निधी अपुरा असल्याने संस्थांवर आपले काम थांबविण्याची वेळ आली आहे. - कल्याणी पाटील, एड्स प्रतिबंधक आणि , नियंत्रण कक्षाच्या प्रमुख-----------हा निधी संस्थांपर्यंत यायला उशीर होतो. आॅक्टोबर महिन्यापर्यंत थकीत निधीतील काही रक्कम येईल अशी आशा आहे. - दीपक निकम, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, प्रकल्प अधिकारी-----------आमच्यासारख्या अनेक संस्था पुण्यात आणि राज्यभरात एड्स नियंत्रणासाठी काम करत आहेत. अशाप्रकारे कोणालाही विश्वासात न घेता कर्मचारी कपात करावी असा आदेश शासनाने काढणे योग्य नाही. एप्रिल २०१५ पासून या कर्मचाऱ्यांचे पगार आम्ही आमच्या खिशातून केले आहेत. इथून पुढे नेमके काय होणार याबाबत कोणतीच ठोस माहिती आम्हाला मिळालेली नाही. याबाबत सरकारने ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. याबाबत राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला असता, त्यांना याबाबत पुरेशी माहिती नसल्याचे आढळले. त्यामुळे दाद कुणाकडे मागायची हा आमच्यापुढील मोठा प्रश्न आहे. - बिंदुमाधव खिरे, समपथिक ट्रस्ट, अध्यक्ष
एड्स नियंत्रण अडकले निधीत
By admin | Updated: July 7, 2015 04:55 IST