पुणे : बांधकाम व्यवसायात भागीदार करण्याच्या आमिषाने एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला ३१ लाख २५ हजार रुपयांचा गंडा घालण्याच्या प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष पोपट चव्हाण (रा. फ्लॅट नं. ३०१, चिंतामणी हौसिंग सोसायटी, मांजरी बुद्रूक) असे गुन्हा दाखल केलेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. एका ६२ वर्षीय सेवानिवृत्त अधिकाऱ्याने फिर्याद दिली आहे. संतोष चव्हाण हे बांधकाम व्यावसायिक आहेत. फिर्यादी यांना सदनिका घ्यायची असल्याने बांधकामाच्या ठिकाणी चव्हाण यांच्याशी त्यांची ओळख झाली. त्यावेळी चर्चेतून माझा व्यवसाय नवीन आहे आणि मला पार्टनरची गरज आहे, असे चव्हाण यांनी फिर्यादींना सांगितले आणि चालू असलेल्या बांधकामाच्या साईटमध्ये भागीदारी देण्याचे आमिष दाखविले. याबाबत कोणताही करारनामा न करता फिर्यादी यांच्याकडून चव्हाण यांनी पैसे ३१ लाख २५ हजार रुपये घेतले. फिर्यादी यांना भागीदारीमध्ये कोणताही हिस्सा देण्यात आला नसल्याने चव्हाण यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सचिन गाडेकर यांनी दिली.
------------------------------