पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ पुण्यात दोन दिवसांत चार सभा घेणार आहेत. १४ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजता हडपसर व ८ वाजता वडगाव शेरी येथे अशा दोन सभा होतील. त्यानंतर १८ फेब्रुवारीला ६ वाजता खडकवासला व ८ वाजता पर्वती येथे दोन सभा होतील. शरद पवार यांच्या प्रचार सभांमुळे निवडणुकीचे वातावरण फिरते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा असते. पालिकेत गेली सलग १० वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. ती टिकवण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेससमोर आहे. भारतीय जनता पक्षाने निवडणुकीत राष्ट्रवादीला पर्याय तयार केला आहे. तो मोडून काढण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील आहे. शरद पवार यांच्या सभांनी ते साध्य होईल, अशा विश्वासाने त्यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
शरद पवार यांच्या पुण्यात चार सभा
By admin | Updated: February 13, 2017 02:30 IST