केंदूर : केंदूर (ता. शिरूर) येथील ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी गृहराज्यमंत्री, माजी खासदार बापूसाहेब ऊर्फ निवृत्ती नामदेव थिटे (वय ७९) यांचे आज (दि. १९) पहाटे ५ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे व एक मुलगी असा परिवार आहे. वडिलांच्या व्यापारी व्यवसायामुळे बापूसाहेब पुण्यात वास्तव्यास होते. मात्र गावासाठी काही करण्याची त्यांची जिद्द असल्याने केंदूर गणातून पंचायत समितीवर आपले राजकारणातील वर्चस्व स्थापन केले. त्या वेळी पहिल्यांदाच केंदूर गावास बापूसाहेबांच्या रूपाने पंचायत समिती सभापतिपदाचा मान मिळाला. गावाबरोबर संपूर्ण तालुक्याशी त्यांचा संबंध येऊ लागला. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यांचे विश्वासू राजकीय सहकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. १९६७मध्ये राजकीय जीवनात सक्रिय होत असताना त्यांना केंदूर-पाबळ गटातून जिल्हा परिषदेसाठी उभे करण्यात आले. राजकीय वातावरणाबरोबर ते १९६७ ते १९७२ जिल्हा परिषद सदस्य झाले. त्या वेळी त्यांना शिक्षण क्षेत्रात सभापतिपद देण्यात आले होते.
माजी गृहराज्यमंत्री बापूसाहेब थिटे यांचे केंदूर येथे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2016 04:49 IST