नारायणगाव : पुणे-नाशिक महामार्गावर सुरू असलेल्या बाह्यवळणात नवीन क्रॉस रस्ते असल्याने विद्यार्थी, नागरिक, शेतकरी यांची मोठी गैरसोय होऊन अपघात वाढण्याची शक्यता आहे. या रस्त्यांवर ज्या ठिकाणी क्रॉस रस्ते आहेत, तेथे उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग करण्यात यावेत; अन्यथा सर्व पक्षांच्या वतीने दि़. २८ जानेवारी रोजी नारायणगाव येथील बसस्थानकासमोर रास्ता रोकोे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष नामदेव (अण्णा) खैरे यांनी दिला आहे.जिल्हाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, तहसीलदार, नारायणगाव पोलीस ठाणे यांना दिलेल्या निवेदनात खैरे यांनी म्हटले आहे, की बाह्यवळणाचे काम वेगाने सुरू आहे़ परंतु , हे काम सुरू असताना नारायणगाव ते खोडद, मांजरवाडी व पाटेखैरेमळा, खडकवाडी या रस्त्याला हा नवीन हायवे क्रॉस (मधून) जात असल्याने नागरिकांची रस्ता ओलांडण्याची गैरसोय होणार असून वाहतुकीची कोंडी होणार आहे़ या रस्त्यावरून एका बाजूने दोन व दुसऱ्या बाजूने दोन अशा वाहनांची ये-जा होणार आहे़ यामुळे बायपासवर सतत अपघात होणार आहेत़ दुपदरी रस्ता असल्याने या रस्त्यावरून भरधाव वाहने जाताना नागरिकांना रस्ता ओलांडणे मुश्कील होणार आहे़ त्यातच शाळेतील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांना दोन रस्त्यांचे अंतर कापताना जीव मुठीत घेऊन जावे लागणार आहे़ भरधाव वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन क्रॉस रस्ते आहेत, त्या ठिकाणी उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग करण्यात यावेत़ (वार्ताहर)
‘बाह्यवळणा’वर उड्डाणपूल, भुयारी मार्गाची गरज!
By admin | Updated: January 14, 2017 03:11 IST