राजानंद मोरे, पुणे पुणे : जनता वसाहत-दत्तवाडी (प्रभाग ३०) या प्रभागामध्ये दत्तवाडी भागातील मतदारांनी कमळाला साथ दिल्याने भाजपाचे तीन उमेदवार निवडून आले आहेत. त्याचवेळी राष्ट्रवादीच्या प्रिया गदादे यांना जनता वसाहत भागात मिळालेली निर्णायक आघाडी इतर तीन सहकाऱ्यांना मिळाली नाही. जनता वसाहतीतील मतविभागणीचा मोठा फटका राष्ट्रवादीच्या तीनही उमेदवारांना बसल्याचे दिसते.प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रिया गदादे व प्रेमराज गदादे यांचा पर्वती पायथा व जनता वसाहतीमध्ये दांडगा जनसंपर्क आहे. अर्चना हनमघर यांना नगरसेवक विनायक हनमघर यांच्यामुळे दत्तवाडी भागात जनाधार आहे. अॅड. वैशाली चांदणे यांचा भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून पर्वती पायथा भागातील नागरिकांशी संपर्क आहे. त्यामुळे या चौघांनाही या प्रभागात मोठी संधी असल्याची चर्चा सुरूवातीपासूनच होती. जनता वसाहत आणि दत्तवाडी व परिसर या दोन्ही भागांतील मतदारांनी स्पष्ट कौल दिला आहे. तुलनेने या प्रभागात भाजपाचे फारसे अस्तित्व नाही. मात्र, काँग्रेसमधून आलेले शंकर पवार आणि राष्ट्रवादीचे आनंद रिठे यांनी भाजपाचे तिकीट मिळविल्याने ही लढत रंगतदार होणार हे स्पष्ट झाले. अनिता कदम या दत्तवाडीलगतच्या भागातील आणि पुष्पमाला शिरवळकर या पर्वती पायथा भागातील असल्याने जनता वसाहतीतून मते मिळण्याबाबत भाजपाला फारशी संधी नव्हती. मतमोजणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अपेक्षेप्रमाणे पहिल्या फेरीत राष्ट्रवादीच्या चारही उमेदवारांनी आघाडी घेतली. या फेरीतील पहिली २० मतदान केंद्र जनता वसाहत भागातील होती. पुढची १० केंद्र याच भागातील तर इतर १० केंद्र पर्वती पायथा भागातील असल्याने दुसऱ्या फेरीतही त्यांनी आघाडी कायम राखली. तिसऱ्या फेरीत भाजपाच्या चारही उमेदवारांनी पिछाडी कमी केली. तर चौथ्या फेरीत मिळविलेल्या मतांनी शिरवळकर वगळता तिघांनीही विजय संपादन केला. या दोन फेऱ्यांमध्ये सर्व केंद्र दत्तवाडी व सिंहगड रस्ता परिसरातील होती. या भागातील मतदारांनी भाजपाच्या उमेदवारांना साथ दिल्याचे स्पष्टपणे दिसून येते. हनमघर यांच्यासह इतर तिघांनाही या भागात फारशी मते मिळाली नाहीत. त्यामुळे पहिल्या दोन फेऱ्यांत मिळालेली आघाडी अखेरपर्यंत टिकली नाही. (प्रतिनिधी)
मतविभागणीने फुलविले कमळ
By admin | Updated: February 25, 2017 02:46 IST