पुणे : पुणे जिल्ह्यामध्ये पाणीटंचाईची परिस्थिती दिवसागणिक गंभीर होत चाललेली असल्याने पाण्याचा कोणत्याही प्रकारे होणारा गैरवापर व अपव्यय टाळण्यासाठी आता भरारी पथके सज्ज झाली आहेत. तालुकानिहाय अशी १४ पथके स्थापन करण्यात आली असून पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर थेट फौजदारी खटले दाखल करण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले आहेत. पावसाने ओढ दिल्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये पाणी आणि चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण होत आहे. विहिरीही कोरड्या पडत असून विविध भागांमध्ये टँकरला मागणी वाढत आहे. मात्र त्याचवेळी अजूनही अनेक भागांमध्ये बांधकामांवर पाणी मारण्यासाठी, वाहने धुण्यासाठी व अन्य कारणांसाठी पिण्याच्या पाण्याचा बेपर्वाईने वापर होत असल्याचे दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी १४ भरारी पथके स्थापन करून कोठेही पाण्याचा अनधिकृत वापर सुरू असल्यास महाराष्ट्र सिंचन कायदा व भारतीय दंडविधानानुसार कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाण्याचा काटकसरीने वापर करावा व अवैध वापरावर आळा घालण्याबाबत आदेश दिले आहेत.या पथकामध्ये महसूल, जलसंपदा, महसूल, विद्युत वितरण, पोलीस या विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. पाण्याचा बेपर्वाईने, बेसुमार पद्धतीने गैरवापर करणारा कुणीही आढळल्यास त्याच्यावर थेट फौजदारी खटले आता दाखल होऊ शकणार आहेत. पाणी उपशाची साधने जप्त करणे, विद्युत कनेक्शन तोडणे असे कठोर उपाय करण्याच्या सूचना राव यांनी केल्या असून पोलीस ठाण्यात तक्रार करून त्याच दिवशी त्याची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय व जलसंपदा विभागास देण्याचे आदेश या पथकास दिले आहेत. पाण्याचा अनधिकृत वापर तातडीने रोखण्यासाठी विद्युत वितरण कंपनीने या पथकांच्या सूचनेनुसार विद्युत पुरवठा त्वरित खंडित करावा. कारवाईबाबतचा साप्ताहिक अहवाल सर्व विभागांनी जिल्हाधिकारी कार्यालयास व पाटबंधारे मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांना पाठवावा, अशा सूचनाही राव यांनी केल्या आहेत. पुणे शहर, हवेली, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, मुळशी, मावळ, भोर, वेल्हे, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड या तालुक्यांसाठी प्रत्येकी पाच जणांचा समावेश असलेले पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. पाटबंधारे विभागाच्या उपविभागीय अभियंत्यास या पथकाच्या प्रमुखपदी नेमण्यात आले असून याच विभागाच्या शाखा अभियंत्याचा, महावितरणच्या सहायक अभियंत्याचा, पोलीस शिपायाचा अशा पाच जणांचा समावेश पथकात असणार आहे. यंत्रणा मात्र अजूनही ढिम्मच गुरुवारी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पाण्याचा गैरवापर रोखण्याचे आदेश काढले असले तरी यंत्रणा जागची हलली नसल्याचे समजते. या महत्त्वाच्या निर्णयाविषयी महसूल व जलसंपदा विभागातील जाणकारांना आजही माहिती नव्हती. पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी दोन दिवसांत काय कार्यवाही झाली, हे समजू शकलेले नाही, मात्र शहरालगतच्या ग्रामीण परिसरात व पिण्याच्या पाण्याचा बांधकामांसाठी वापर सुरु होता. पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात सुरूच असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असून शनिवार आणि रविवारी सुटी असल्याने कारवाईलाही विश्रांती मिळाली होती.प्रबोधनावरही भर दरम्यान, धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा असल्याने उपलब्ध पाण्याचा वापर जपून करण्याच्या सूचना ग्रामसेवकांच्या माध्यमातून गावोगावी दिल्या जाणार असून त्यानंतरही पाण्याचा गैरवापर सुरू असल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी आज सांगितली. नुसताचघोषणांचापाऊस?पावसाने ओढ दिल्यामुळे सध्या धरणांमध्ये अपुरा पाणीसाठा आहे. अशा स्थितीत कालव्यातून बेकायदेशीररीत्या पाणी उपसा करणाऱ्यांवर महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियमांतर्गत तत्काळ कारवाई करण्याच्या, पिण्याव्यतिरिक्त बांधकाम, जलतरण तलावासाठी पाणीवापरावर बंदी घालण्याच्या घोषणा दोन वर्षांपूर्वीच्या टंचाईप्रमाणे यंदाही झाल्या. या घोषणेनुसार तहसील कार्यालय, जलसंपदा विभाग कधी कारवाई करणार, याविषयी नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. पावसाने ओढ दिल्यानंतर दरवेळी अशा प्रकारच्या घोषणा होतात, त्यावर प्रत्यक्षात काही कारवाई होत नाही. कालव्यांतून, तलावांमधून, नळ-पाणीपुरवठा योजनांमधून पाण्याची बिनधास्त चोरी होत असल्याची उदाहरणे आहेत.
भरारी पथके सज्ज
By admin | Updated: August 30, 2015 02:58 IST