लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : देशभरात विविध उद्योग, व्यवसायात पाच हजार दलित महिलांना उद्योजक करण्याचा संकल्प दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय एस.एसी हब व डिक्कीच्या वतीने महिला दिनानिमित्त आयोजित उद्योजक (व्हेंडर) विकास कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
पद्मश्री कांबळे म्हणाले की, महिला उद्योजिकांना सहकार्य करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध योजना तयार करीत आहे. त्या योजना सर्वांपर्यंत पोहचवण्याचे कार्य डिक्की ही संस्था करीत आहे. सरकारचे व त्यासंबंधी निगडित कंपनी व संस्थांचे खरेदी धोरण हे महिलांसाठी ३ % आहे व अनुसूचित जातींसाठी ४ % आहे. या धोरणाचा व योजनेचा फायदा नवीन उद्योजक व महिलांनी घ्यावे.
उद्योजिका उल्का सादलकर यांनी डिक्कीच्या सहकार्याने दलित महिलांनी उद्योग व्यवसायात स्थान निर्माण करावे असे आवाहन केले. मोनिका जगताप, अर्चना सोंडे, प्राजक्ता नखाते, स्नेहा सकटे, तन्वी लोंढे, सीमा उकिरंडे, पुष्पा जाधव, सुनीता खंडागळे, स्मिता कांबळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय एसी, एसटी हबचे तरेश घोरमोडे, अविनाश जगताप, सीमा कांबळे, निवेदिता कांबळे, जयश्री नेटके, प्राजक्ता गायकवाड, मानसी वाघमारे, अनिल होवाले, संतोष कांबळे, चित्रा उबाळे आदी यावेळी उपस्थित होते.