पुणे : जिल्हा ३१ मार्चपर्यंत हगणदरीमुक्त करायचा असून, जिल्हा परिषदेच्या नवीन अध्यक्षांसमोरील हे पहिले आव्हान असेल. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ९९.६२ टक्के काम झाले असून, हातात फक्त ९ दिवस राहिले आहेत. यात इंदापूर तालुक्यात सर्वाधिक १ हजार ४८० शौचालये बांधणे बाकी आहे. विश्वास देवकाते यांनी अध्यक्षपदाची, तर आंबेगावचे विवेक वळसे-पाटील यांनी उपाध्यक्षपदाची धुरा घेतली आहे. मात्र, या दोघांचेही तालुके अद्याप हगणदरीमुक्त झालेले नाहीत. अध्यक्षांच्या बारामती तालुक्यात २५० कटुंबांकडे अद्याप शौचालये नसून त्यात त्यांच्या स्वत:च्या नीरावागज गावात १८९ कुटुंबांनी ती अद्याप बांधलेली नाहीत. नीरावागज शौचालययुक्त झाल्यास बारामती तालुका हगणदरीमुक्त होऊ शकतो. उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांच्या आंबेगाव तालुक्यात २९७ कुटुंबे बाकी आहेत. मावळ तालुक्यात २०१, तर गटनते शरद लेंडे यांच्या जुन्नर तालुक्यात १०६ वैयक्तिक शौचालये बांधणे बाकी आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांचेच तालुके होणे बाकी आहे.हाती राहिलेले ९ दिवस पाहता, आंबेगाव, बारामती, जुन्नर व मावळ ३१ मार्चअखेर हगणदरीमुक्त होऊ शकतील, यात शंका नाही. मात्र, इंदापूर तालुक्यात अजून मोठे काम करावे लागणार आहे. १ हजार ४८० कुटुंबे अजून होणे बाकी आहे. ४३ गावे अजून बाकी आहेत. यात माजी मंत्र्यांच्या बावडा गावात सर्वाधिक २५७ शौचालये बांधणे बाकी आहे.
पहिले आव्हान जिल्हा हगणदरीमुक्तीचे
By admin | Updated: March 23, 2017 04:14 IST