पुणे : नातेवाइकांसोबत झालेल्या भांडणाच्या रागातून तीन मुजोर तरुणांनी केलेल्या बेछूट गोळीबारात तीन जण जखमी झाले असून, यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. एका पादचाऱ्याच्या जबड्यामधून घुसलेली गोळी हनुवटीमधून बाहेर आली, तर तेथून जात असलेल्या एका महिलेच्या दंडामध्ये एक गोळी लागली. तर हल्लेखोरांचा नातेवाईक मनगटामध्ये गोळी लागल्याने जखमी झाला आहे. सिंहगड रोड पोलिसांनी तिघांना अटक केली असून, ही घटना शनिवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास घडली.विनायक शिवाजी रानवडे (वय २२), ऋषीकेश श्रीरंग रानवडे (वय १९), सूरज दिलीप रानवडे (वय २२, रा. भैरवनाथ मंदिरामागे, नऱ्हेगाव, ता. हवेली) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी दीपक अशोक वाल्हेकर (वय ३६, रा. विश्वकृपा, भैरवनाथ मंदिरामागे, नऱ्हेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींच्या हल्ल्यात वाल्हेकर यांच्यासह दत्तात्रय गंगाराम कांबळे (वय ३३, रा. नऱ्हेगाव, मूळ रा. सुगाव, देगलूर, जि. लातूर) आणि संगीता उत्तम वाघ (वय ३०, रा. नऱ्हेगाव) हे दोघे जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांचे नातेवाईक आहेत. ते एकाच भागात राहण्यास असून, सर्वांचा बांधकाम व्यवसाय आहे. शनिवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास आरोपी अनिकेत वाल्हेकर याला मारहाण करीत होते. त्या वेळी दीपक यांना त्यांचा चुलतभाऊ ऋषीकेश राजेंद्र वाल्हेकर याने फोन करून अनिकेतला मारहाण होत असल्याचे सांगितले. त्यानुसार दीपक अन्य भावंडांसह घटनास्थळी मदतीसाठी पोचले. आरोपी सूरज याला मारहाणीचा जाब विचारताच त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. घरामध्ये पळालेला सूरज काही कळायच्या आतच गावठी पिस्तूल घेऊन बाहेर आला. रागाच्या भरात त्याने दीपक यांच्यावर गोळी झाडली. ही गोळी त्यांच्या डाव्या हाताच्या मनगटामध्ये घुसली. तोपर्यंत घटनास्थळावर मोठी गर्दी झाली होती. विनायक रानवडे याने दहशत निर्माण करण्यासाठी आणखी दोन गोळ्या लोकांच्या दिशेने झाडल्या. रस्त्याने पायी घराकडे जात असलेल्या दत्तात्रय कांबळे यांच्या जबड्यात एक गोळी घुसून हनुवटीमधून आरपार बाहेर आली, तर दुसरी गोळी संगीता वाघ यांच्या डाव्या हाताच्या दंडाला लागली आहे.जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असून, या मुजोर तरुणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वरिष्ठ निरीक्षक जगताप यांनी सांगितले़गोळीबार करून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. जखमींना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिसांना घटनेची माहिती उशिरा मिळाली. माहिती मिळताच उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त मिलिंद मोहिते, वरिष्ठ निरीक्षक विष्णू जगताप, निरीक्षक (गुन्हे) नितीन जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. रविवारी पहाटेपर्यंत सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात होते. त्यांना रविवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता सरकारी वकील रजनी तहसीलदार यांनी पोलीस कोठडीची मागणी केली. ही मागणी ग्राह्य धरत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. टी. गोट्ये यांनी २३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
नऱ्हेत भांडणातून तरुणांचा गोळीबार
By admin | Updated: March 21, 2016 01:00 IST