पुणे: शहराच्या सुरक्षेच्या दृष्टिने अत्यंत महत्वाच्या असलेल्या महापालिकेच्या अग्निशमन दलाकडे आगीचा सामना करणाऱ्या जवानांचीच संख्या कमी आहे. मंजूरपदाच्या निम्मेच जवान या विभागाकडे असून त्यांच्याच जीवावर शहरातील आगीसारख्या घटनांचा सामना केला जात आहे. अग्निशमन विभाग महापालिकेच्या अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश होतो. आगीसारख्या दुर्घटनांबरोबरच अनेक आपत्तींच्या काळात याच विभागाचे जवान प्राणहानी थांबवतात, वित्तहानीपासून वाचवतात. त्यांच्याकडे मंजूर असलेल्या ९२१ पदांपैकी ४४९ पदांवर कर्मचारी कार्यरत आहे. तब्बल ४७२ पदे रिक्त आहेत. वारंवार मागणी केल्यानंतरही प्रशासनाकडून या भरतीकडे दुर्लक्ष केले जात आहे. आपत्तींचा सामना करणारा हा विभागच प्रशासनाकडून दुर्लक्षित केला जात आहे. शहराची लोकसंख्या व क्षेत्रफळ यानुसार किती अग्निशमन केंद्र असावीत हे निश्चित केलेले आहे. तसेच प्रत्येक केंद्रात किती कर्मचारी असावेत हेही निश्चित केलेले आहे. हे दोन्ही निकष महापालिकेत पाळले गेलेले नाहीत. केंद्रांची संख्याही कमी आहे व आहे त्या केंद्रात कर्मचारी संख्याही कमी आहे. आग विझवणारी वाहने चालवण्यासाठीही या विभागाकडे चालक नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या मोटार वाहन विभागाकडून कंत्राटी सेवेतील ३१ चालक या विभागाला देण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अॅड. गफूर पठाण यांनी प्रशासनाला याबाबत माहिती विचारली होती. त्यांना दिलेल्या लेखी उत्तरात प्रशासनानेच त्यांना ही माहिती दिली आहे.
अग्निशमन दलाकडे जवानांची संख्या अपुरी : तब्बल ४७२ पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 21:50 IST
अग्निशमन विभाग महापालिकेच्या अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश होतो. आगीसारख्या दुर्घटनांबरोबरच अनेक आपत्तींच्या काळात याच विभागाचे जवान प्राणहानी थांबवतात, वित्तहानीपासून वाचवतात.
अग्निशमन दलाकडे जवानांची संख्या अपुरी : तब्बल ४७२ पदे रिक्त
ठळक मुद्दे मंजूर असलेल्या ९२१ पदांपैकी ४४९ पदांवर कर्मचारी कार्यरत वारंवार मागणी केल्यानंतरही प्रशासनाकडून या भरतीकडे दुर्लक्ष