पुणे : ग्रामस्थांनी कचरा टाकण्यास विरोध केल्यामुळे वर्षभरापूर्वी निर्माण झालेल्या कचरा डेपाच्या विषयाला महापालिकेला पुन्हा तोंड द्यावे लागणार आहे. उरळी कांचन तसेच फुरसुंगी ग्रामस्थांनी त्यांच्या गावाच्या हद्दीत कचरा टाकण्यासाठी दिलेली मुदत संपली असून, महापालिकेने अद्याप या विषयावर काहीही विचार केलेला नाही. शहरातून रोज काही टन कचरा जमा केला जातो. गेली अनेक वर्षे तो उरुळी कांचन तसेच फुरसुंगी येथील कचरा डेपोवर टाकला जात होता. मात्र तेथील ग्रामस्थांनी याला विरोध केल्याने मागील वर्षी शहरात कचऱ्याची अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली होती. कचरा टाकायचा कुठे, असा प्रश्न निर्माण झाला होता, त्यावर उत्तर सापडत नसल्याने तो आहे तिथेच जाळून नष्ट केला जात होता. अखेर या प्रश्नात थेट मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला. त्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ३० सप्टेंबर २०१५ पर्यंतच या दोन्ही गावांच्या हद्दीत कचरा टाकण्यात येईल असे ठरले. तत्पूर्वी नवा कचरा डेपो शोधणे ही पालिकेची जबाबदारी होती.मात्र, आता मुदतीच्या अगदी अखेरच्या दिवशी महापालिकेला जाग आली आहे. स्थायी समितीच्या २६ सप्टेंबरच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली व स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम यांनी या घनकचरा व्यवस्थापन विभागाला यासाठी शनिवारी (उद्या) बैठक आयोजित करण्यास सांगितले. त्याप्रमाणे आता उद्या स्थायी समिती सभागृहात या विषयावर बैठक होत आहे.
शोधावा लागणार नवा कचरा डेपो
By admin | Updated: October 3, 2015 01:49 IST