भोर : नगरपालिकेतील राजकीय वादामुळे शहरातील विकासकामांची कोंडी झाली आहे. सभाच होत नसल्याने कामांना मंजुरी मिळत नव्हती. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या विशेष परवानगीने आज विशेष सभा झाली. त्यात विविध कामांसाठी सुमारे ४ कोटी २८ लाख रुपयांच्या विकासकामांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली, मात्र, नगराध्यक्षा दीपाली शेटे मात्र या सभेलाही गैरहजर राहिल्या.वेळोवेळी मागणी करूनही नगराध्यक्षा दीपाली शेटे यांनी सभेचे आयोजन केले नाही. त्यामुळे काँग्रेस नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन सभेचे आयोजन करण्याची विनंती केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी २० मे रोजी सभेचे आयोजन करून सभेचे अध्यक्ष म्हणून उपविभागीय अधिकारी संजय आसवले यांची निवड केली होती.आज दुपारी एक वाजता नगरपालिकेच्या शिवाजी सभागृहात विशेष सभा घेण्यात आली. या वेळी काँग्रेसचे सर्व नगरसेवक तर राष्ट्रवादीचे ३ जण हजर होते. या सभेमुळे भविष्यात शहरातील वीज, पाणी, कचरा हे प्रश्न मार्गी लागणार आहेत. शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सभेलाच नगराध्यक्षा गैरहजर राहिल्या असा आरोप पत्रकार परिषदेत काँग्रेस नगरसेवकांनी केला. या वेळी उपनगराध्यक्ष तानाजी तारु,नगरसेवक चंद्रकांत सागळे, उमेश देशमुख, अॅड. जयश्री शिंदे, डॉ. विजयालक्ष्मी पाठक, गजानन दानवले, तृप्ती किरवे, देविदास गायकवाड उपस्थित होते. भोर शहराचा विकास आराखडा तयार करून तो शासनाकडे पाठवण्यासाठी नगराध्यक्षांकडे सही करण्यासाठी तो पाठवला. मात्र, त्यावर त्यांनी सही केली नाही. आराखड्यावर त्यांची हरकत होती. हरकत घेण्यासाठी ३ डिसेंबरच्या सभेला हजर नव्हते. आणि आता पाच महिने झाल्यावर आमदार व नगरसेवकांवर सूडबुद्धीने बिनबुडाचे आरोप केले. त्याचा आम्ही निषेध करीत आहोत, असे काँग्रेस नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत सांगितले. काँग्रेस नगरसेवकांनी विकास आराखडा समितीत मला घेतले नाही आणि आराखडा बनवताना विश्वासात न घेताच नगरसेवकांचे हितसंबंध जपणारा आराखडा तयार करण्यात आला. शिवाय या संंबंधीचे सर्व अधिकार मुख्याधिकारी यांनाच दिल्याने मी आराखड्यावर सही केली नाही, असे नगराध्यक्षा दीपाली शेटे यांनी सांगितले. (वार्ताहर)
अखेर भोर नगरपालिकेची विशेष सभा झाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2015 23:07 IST