लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आंतरराष्ट्रीय स्तरावर दुध भुकटीच्या किंमती कमी झाल्यानंतर राज्य शासनाने गायीच्या दुधाला प्रति लिटर तीन रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते. परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून हे अनुदान मिळण्यासाठी संबंधित दुध डेअरी मालकांकडून प्रचंड पाठपुरावा सुरू होता. अखेर शासनाने थकीत अनुदानापोटी २५ कोटी ६९ लाख ८८ हजार ९८२ रुपयांचे अनुदान नुकतेच वितरित केले. यात दुध भुकटी तयार करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील ५ व नगर जिल्ह्यातील एक दुध डेअरीचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर दुध भुकटीचे दर प्रचंड मोठ्याप्रमाणात कोसळले होते. यामुळे शासनाने दुधाची निश्चित केलेली रक्कम शेतकऱ्यांना देणे शक्य नसून यामुळे खाजगी दूध संघ अडचणीत सापडले आहेत. यामुळे शासनाने अनुदान देण्याची मागणी करण्यात आली होती, त्यानुसार शासनाने
गायीच्या दुधाला १ फेब्रुवारी ते ३० एप्रिल २०२० या काळात प्रति लिटर तीन रुपये अनुदान देण्याची योजना राबविली. वित्त विभागाकडून ही रक्कम मंजूर होवून दुग्ध व्यवसाय विकास विभागास काही दिवसांपुर्वीच प्राप्त झाली. अनुदान वाटपाची रक्कम खाजगी बँकेऐवजी राष्ट्रीयकृत बँकांमार्फत राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार काम सुरु असून, अनुदान वितरणास थोडा अवधी लागल्याची माहिती पुणे प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी प्रशांत मोहोड यांनी दिली. त्यानुसार नुकतीच अनुदान रक्कम वितरित करण्यात आलेली आहे.
-------
या दुध डेअरींना मिळाले अनुदान
- एल.व्ही.डेअरी पाटस ९० लाख ११ हजार
- श्रायबर डायनामिक्स डेअरीज प्रा.लि. ४ कोटी ६८ लाख ९५ हजार
- इंदापुर डेअरी अॅण्ड मिल्क प्रॉडक्टस लि. ७ कोटी ३५ लाख ९१ हजार
- पराग मिल्क फुडस लि. ६ कोटी ९२ लाख ४५ हजार
- कुतवळ फुडस प्रा. लि. ३ लाख ७५ हजार
- प्रभात डेअरी प्रा.लि. अहमदनगर ५ कोटी ७८ लाख