पुणे : ईशान्य भारतातील संस्कृतीचे दर्शन घडण्याबरोबरच तेथील चित्रपटांचा आस्वाद घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) च्या वतीने आणि डायरेक्टोरेट आॅफ फिल्म फेस्टिव्हल्स (डीएफएफ), फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय), सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी व नॉर्थ ईस्ट कम्युनिटी आॅर्गनायझेशन यांच्या सहकार्याने उद्या (शनिवार) पासून दि. ३० जानेवारीपर्यंत ‘ईशान्य भारतातील चित्रपटांचा महोत्सव’ आयोजिण्यात आला आहे.एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. या वेळी डीएफएफचे राजन, एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कँथोला, सिंबायोसिसचे डॉ. शिरीष सहस्रबुद्धे उपस्थित होते. या महोत्सवाचे उद्घाटन उद्या (शनिवारी) केंद्रीय विज्ञान व प्रसारण मंत्रालयाचे सचिव अजय मित्तल यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यानंतर अन्वेशा महांता आणि नागाजिनियस ग्रुपकडून ईशान्य प्रदेशाचा सांगीतिक प्रवास नृत्याविष्कारातून उलगडला जाणार आहे. भास्कर हजारिका यांच्या ‘कोथनोदी’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाने महोत्सवास प्रारंभ होणार आहे. महोत्सवाच्या पुढील दोन दिवसात ‘लोकटक लायरम्बी’ (मणिपुरी), ओंटाह (खासी), सँबिन अलून (कार्बी), आॅटो ड्रायव्हर, गन्स अँड गिटार्स, किमास लोड-बियाँड द क्लास, इमा सबित्री, तेजपूर आदी चित्रपटांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. ईशान्य भारतातील खाद्यसंस्कृती हे महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.(प्रतिनिधी)
रंगणार चित्रपट महोत्सव
By admin | Updated: January 28, 2017 01:19 IST