कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा व डिंंग्रजवाडी (ता. शिरूर) येथील ४० एकरांपेक्षा जास्त क्षेत्रातील ऊस वीजवाहिन्यांमधून उडालेल्या ठिणग्यांमुळे जळून खाक झाला. शेतकऱ्यांनी भरपाई देण्याची मागणी केली आहे. तर विद्युत कंपनीचे अधिकाऱ्यांनी विद्युत निरीक्षकाच्या अहवालानंतरच जबाबदारी स्पष्ट होईल, असे सांगितले. आज दुपारी दीडच्या सुमारास डिंंग्रजवाडी गावच्या हद्दीत वीज पारेषण कंपनीच्या उच्च क्षमतेच्या वीजवाहिन्यांखाली असणाऱ्या उसाला वाहिन्यांमधून उडालेल्या ठिणग्यांमुळे आग लागली. क्षणात आगीचे डोंब उच्च क्षमतेच्या तारांच्या उंचीपेक्षाही वरती गेले होते. या क्षेत्राच्या शेजारीच ऊसतोड करणाऱ्या मजुरांनी व शेतकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु दुपारचे कडक ऊन व सोसाट्याचा वारा यामुळे आगीने मोठ्या प्रमाणावर क्षेत्र व्यापून टाकले होते. आग आटोक्यात आणणे शक्य होत नसल्याने व त्यात वीजपुरवठाही खंडित झाल्याने वीजपंप चालू होत नसल्याने आग विझवण्यात अडचणी येत असल्याचे माजी उपसरपंच मधुकर गव्हाणे यांनी सांगितले.या घटनेची माहिती शिक्रापूर पोलिसांना व रांजणगाव, शिरूर येथील अग्निशमन दलाला देण्यात आली. दरम्यान, आगीला वाऱ्याची साथ मिळाल्याने आग पूर्वेकडून पश्चिमेकडे जात डिंंग्रजवाडी हद्दीतून कोरेगाव हद्दीतील उसाच्या शेतापर्यंत पोहोचली. आगीच्या भक्ष्यस्थानी उसाचे फडच्या फड शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर खाक झाले. उसाच्या फडातील काही ऊस तोडून आग रोखण्याचा प्रयत्न कोरेगावातील हनुमान सेवा मंडळाचे अध्यक्ष कचरू ढेरंगे यांच्या पुढाकाराने काही शेतकऱ्यांनी केल्याने अनेक शेतकऱ्यांच्या उसाचे फ ड व इतर पिके आगीच्या तडाख्यातून वाचवण्यात यश आले. दरम्यान, अग्निशमन यंत्रणा मात्र जळीत क्षेत्रापर्यंत पोहोचू शकलीच नाही. दरम्यान, घटनास्थळाची पाहणी व शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रकाश खांडेकर यांनी सायंकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वीजवाहिन्यांमधून पडलेल्या ठिणग्यांमुळेच आग लागल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असले तरीही नेमकी आग उच्च दाब वाहिनीमुळे लागली, की कमी दाब क्षमतेच्या वाहिन्यांमुळे लागली, याचे निश्चित कारण शोधण्यात येत आहे; तसेच याबाबत विद्युत निरीक्षकांना जळिताची माहिती दिली असून विद्युत निरीक्षकांनी घटनास्थळी पाहणी करून दोषनिश्चिती केल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असे सांगितले. नुकसानभरपाईसाठी पाठपुरावा करणार असल्याचे ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष रमेश टाकळकर व कोषाध्यक्ष भानुदास सरडे यांनी सांगितले. (वार्ताहर)
शेतक-यांना ‘हायटेन्शन’चा झटका!
By admin | Updated: February 22, 2015 22:57 IST