पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आता १८ जानेवारीपर्यंत अर्ज भरता येणार असल्याची माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.
बारावी परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी ४ जानेवारीपर्यंत मुदत होती. परीक्षेचे अर्ज ऑनलाइन स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत अर्ज भरावेत, असे आवाहन मंडळाने केले आहे.
नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल डाटाबेसवर भरणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांची माहिती सरल डाटावरून उपलब्ध नाही, त्यांना ‘ऑल अॅप्लिकेशन’च्या लिंकमधून प्रचलित पद्धतीने अर्ज भरता येतील. व्यवसाय अभ्यासक्रमाचे नियमित विद्यार्थी, पुर्नपरीक्षार्थी, यापूर्वी नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती सरल डाटामध्ये नसल्याने त्यांचे अर्ज प्रचलित पद्धतीने ऑनलाईन भरता येणार आहे. त्यासाठीही १८ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
------