पुणे : शहरात चौथ्या टप्प्यातील लसीकरण सुरू करण्यात आलेले असून, ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. लसीकरण मोहीम अधिक गतिमान करण्यासाठी पालिकेकडून ३२ दवाखान्यांमध्ये ‘विस्तारित लसीकरण केंद्र’ कार्यान्वित केली जाणार आहेत. पुढील दोन दिवसांत ही केंद्र सुरू होणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिली.
शासनाच्या आदेशाप्रमाणे १ एप्रिलपासून ४५ वर्षांपुढील सर्वांना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. पालिकेचे दवाखाने, शासकीय रुग्णालये आणि खासगी रुग्णालये असे मिळून ११६ केंद्रांवर सध्या लसीकरण सुरू आहे. लसीकरणाला वाढणारी गर्दी लक्षात घेता आणखी केंद्र वाढविण्यात येणार आहेत.
पालिकेच्या ओपीडीमध्येच लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ओपीडीमध्ये रुग्ण तपासणी तसेच लसीकरणाची सुविधा आहे. मात्र, त्याठिकाणी नोंदणी करणे, रुग्णांसाठी प्रतीक्षा कक्ष तसेच लसीकरणानंतरच्या निरीक्षण कक्षाची सुविधा नाही. त्यामुळे या ओपीडीच्या जवळ असलेल्या पालिकेच्या शाळा तसेच मिळकतींमध्ये खाटांची सुविधा, संगणक यंत्रणा, तसेच रुग्णांना बसण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या ३२ केंद्रांपैकी १६ केंद्र मंगळवारी तर १६ केंद्र बुधवारी सुरू केली जाणार आहेत. या विस्तारित लसीकरण केंद्राच्या ठिकाणी नागरिकांना सावलीची सुविधा राहणार असून पाणी तसेच बसण्याची व्यवस्थाही केली जाणार आहे.