पिंपरी : शिक्षणाअभावी जंगलातील माडीया आदिवासी लोकांचे आर्थिक शोषण सरकारी अधिकारी व ठेकेदार करीत असल्याचे निदर्शनास आल्याने आदिवासींच्या शिक्षणासाठी शाळा काढली. तेथेच आमच्या दोन्ही मुलांना शिकवून उच्चशिक्षित केले. आता बाबांची तिसरी पिढी हेमलकशात लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासींची सेवा करीत आहे. उक्ती आणि कृतीमध्ये विसंगती नसावी, हे बाबांनी आम्हाला शिकवले. या सर्व प्रकल्पाला समाजातील विविध स्तरांतील नागरिकांनी मदत केली. हीच आमची ऊर्जा होय, असे प्रतिपादन डॉ. प्रकाश आमटे यांनी चिंचवड येथे केले. अभिनव सोशल फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय अभिनव पुरस्कार सोहळ्यात आमटे बोलत होते. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे होते. खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी नगरसेवक मधुकर बाबर, शिवसेना जिल्हाप्रमुख रामशेठ गावडे, उपजिल्हा प्रमुख भगवान वाल्हेकर, पिंपरी शहरप्रमुख योगेश बाबर, माजी महापौर मंगलाताई कदम, नगरसेविका सुलभा उबाळे, नगरसेवक नारायण बिहरवाडे, शिवसेनेचे विभागप्रमुख नाना काळभोर उपस्थित होते. (प्रतिनिधी)४लोकबिरादारीचे प्रकल्पप्रमुख डॉ. प्रकाश बाबा आमटे व डॉ. मंदाकिनी प्रकाश आमटे, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, ज्येष्ठ सिनेअभिनेत्री मधु कांबीकर, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे संचालक डॉ. गिरीश प्रभुणे यांना प्रदान करण्यात आला.
शिक्षणाअभावी आदिवासींचे शोषण : प्रकाश आमटे
By admin | Updated: January 10, 2015 00:49 IST